कोरची तालुक्यात पुष्पा स्टाईलने सागवानची तस्करी

140

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 गडचिरोली, ता. १७ : कोरची तालुक्यात पुष्पा स्टाईल सागवान तस्करीची मोठी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वनविभागाने १६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला असू एकाला अटक केली, तर पाच आरोपी फरार आहेत.

कोरची तालुक्यात ४० ते ५० वर्षांपासून उभ्या असलेल्या सागवानच्या झाडांवर तस्करांनी आपला डोळा ठेवला असून आजपर्यंत या तस्करांनी तालुक्यातील कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल विकून टाकत सागवानचे जंगल साफ केल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून या टोळीच्या शोधात वनविभाग होते. परंतु ते नेहमी वनविभागाला गुंगारा देत असल्यामुळे वनविभागाला कार्यवाही करण्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली. मागील काही दिवसांपासून पुष्पा स्टाईलने अशाप्रकारे यांचे अवैध धंदे सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एखाद्या सिनेचित्रपटालासुद्धा लाजवेल असे काहीसे चित्र या जंगल परिसरात दिसून आले. रविवार (ता. १६) वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना बेतकाठीच्या जंगलात सागवानची तस्करी होत असल्याचे कळले. त्या आधारे वनविभागाच्या चमुने सापळा रचत रात्री सुमारे ८ वाजतापासून या तस्करांवर पाळत ठेवली होती. मध्यरात्री सुमारे १२ वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टर, पिकअप वाहनामध्ये सागवानचे लठ्ठे भरून निघत असताना वनविभागाने धडक मोहीम राबवली. वनविभागाचे कर्मचारी आपल्या दिशेने येत असल्याचे बघून झाड तोडणारे मजूर व तस्कर पसर झाले. परंतु त्यापैकी एका तस्कराला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. घटनास्थळी विना नंबरचा ट्रॅक्टर ,पिक अप ,मोटरसायकल ,लाकुड कापण्यासाठी वापरण्यात‌ येणारी अवजारे सापडली. हे सगळे साहित्य जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेला आरोपी सुरेश रामलाल होळी हा कोरची तालुक्यातील कुमकोट येथील रहिवासी असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून मोक्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी एल. एम. ठाकरे, वनरक्षक एस. एम. ठाकरे, व्ही. एस. कवडो, सी. एस. मडावी, एन. आर. मितलामी, एम. बी. कुंजाम, जे. एम. चुरगाये व बेतकाठी गावातील १५ ते २० गावकरी उपस्थित होते. सोमवार (ता.११७) सकाळी सहाय्यक वनरक्षक व्ही. व्ही. धांडे यांनी बेडगाव येथे येऊन संपूर्ण प्रकरणाची पाहणी केली. वनविभागाने कारवाई केलेल्या परिसरात वनविभागाने रात्री ३ झाड जप्त केले परंतु सकाळी पंचनाम्याकरिता मोक्यावर गेले असता ५० पेक्षा जास्त झाडे कापलेली दिसून आली. त्यापैकी बहुतांश मुद्देमाल हा तिथून गायबसुद्धा दिसून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.