१ लाख ३० हजारांची लाच मागणारा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

155

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. २६ : रोखलेल्या पगाराच्या पुरवणी बिलाकरिता ना देय प्रमाणपत्र देण्यासाठी १ लाख ३० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.डॉ. संभाजी भोकरे ( वय ३६) असे आरोपी वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार आरोपी वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे याने तक्रारदारास ३ फेब्रुवारी २०२५ व २५ मार्च २०२५ रोजी लाच मागितली. फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२४ व नोव्हेंबर महिन्याच्या १४ दिवसांच्या रोखलेल्या पगाराच्या पुरवणी बिलाकरिता कार्यालय प्रमुख म्हणून लागणारे सहीचे ना देय प्रमाणपत्र देण्याकरिता वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे याने १,५०,००० रुपयांची लाच मागणी करून पंचासमक्ष तडजोडीअंती १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितली.तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदविली. लाहेरी परीसर हा माओवाददृष्ट्या अतिशय संवेदनशील परीसर आहे. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक संतोष पाटील, पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड व टिम यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरीत्या शहानिशा करून सापळा रचला. पडताळणी दरम्यान तक्रारदार लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्य काळात हजर असताना पंचासमक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे याने लाचेची मागणी केल्याने त्याच्याविरूद्ध गडचिरोली पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला ताब्यात घेऊन अटक करून पुढील कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, अपर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात व पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक संतोष पाटील, शिवाजी राठोड, सहायक फौजदार सुनिल पेद्दीवार, पोलिस हवालदार राजेश पद्मगिरीवार, किशोर जौजांरकर, स्वप्नील बांबोळे, पोलिस अंमलदार संदीप उडान, संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके, हितेश जे‌ट्टीवार, महिला पोलिस शिपाई विद्या म्हशाखेत्री, ज्योत्स्ना वसाळे, चालक पोलिस हवालदार राजेश्वर कुमरे यांनी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील करत आहेत.