ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ३१ : जिल्ह्यातील चामोर्शी येथील भाजपचे नगरसेवक आशीष पिपरे यांच्या विरोधात महिलांनी फसवणूकीची तक्रार केली आहे. आशीष पिपरे यांनी अगरबत्ती उद्योगासाठी ४० हून अधिक महिलांच्या नावावर कर्ज उचलून फसवणूक केल्याचा गंभीरा आरोप गुरुवार ३१ मार्च २०२५ रोजी महिलांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा दिला. दरम्यान, भाजप नगरसेवक आशीष पिपरे यांनी सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
पत्रपरिषदेला कविता किरमे, दिलीप किरमे, वंदना कोठारे, शालिनी पिपरे यांचा सोबत बहुसंख्येने महिला पुरुष उपस्थित होते . यावेळी अगरबत्ती व्यवसायाच्या नावाखाली गैरव्यवहार केल्याच्या आरोपासह ट्रॅक्टर खरेदी- विक्री व्यवहार तसेच चिचडोह बॅरेजमध्ये अधिग्रहित केलेल्या जमिनीचा अधिकचा मोबदला मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा आरोप त्यांचावर करण्यात आले. यासंदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशाराही महिलांनी दिला. यासंदर्भातील सर्व पुराव्यानिशी पोलिस ठाणे व न्यायालयात तक्रार केली, पण दखल घेतली नाही. मात्र न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहू, असे महिलांनी सांगितले. अगरबत्ती मशीनसाठी कर्ज मिळवून देतो असे सांगत कागदपत्रे घेतली. अनेक कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतल्या. पण मशीन आपल्याच घरी ठेवली. कर्जवसुलीसाठी बँकेची नोटीस प्राप्त झाल्यानंतर आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. याविरुद्ध आम्ही चार वर्षांपासून पोलिस ठाणे, प्रशासन व
लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करून थकलो, पण कोठेही न्याय मिळाला नाही. नगरसेवक आशीष पिपरे यांनी नेत्यांच्या नावे आम्हाला धमकावले असा आरोप तक्रारदार महिलांनी केला. त्यांनी माजी खासदारांचे नावही घेतले. मात्र नगरसेवक आशीष पिपरे यांनी यासंदर्भात दिलेल्या खुलाश्यात म्हटले आहे की, हे सर्व आरोप निराधार असून राजकीय हेतूने प्रेरित आहेत. माझी प्रस्थापितांविरोधात राजकीय लढाई सुरू आहे. त्यामुळे माझी प्रतिमा डागाळण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. राजकीय वैमनस्यातून बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी संबंधितांनी माझ्याविरुद्ध पोलिस ठाणे, न्यायालयात जावे. माझी बदनामी करणाऱ्यांविरुद्ध मी कायदेशीर कारवाई करणार आहे, असेही नगरसेवक आशीष पिपरे यांनी म्हटले आहे.










