ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ७ : ‘हॉलमार्क’ प्रमाणित सोने म्हणजे शतप्रतिशत खरे सोने म्हणून खरेदी केले जाते. पण ‘हॉलमार्क’ प्रमाणित बनावट दागिने देत एका दाम्पत्याने सराफा व्यावसायिकालाच दीड लाख रुपयांनी गंडवल्याने सोन्याच्या ‘हॉलमार्क’ प्रमाणित दागिन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात सोमवार (ता. ७)ही घटना उजेडात आली. याबाबत गडचिरोली पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अक्षय संजय हर्षे यांचे चामोर्शी रोडवर सराफा दुकान आहे. शुक्रवार (ता. ४) दुपारी अक्षय हर्षे हे घरी गेले होते, तर दुकानात त्यांचे वडील संजय वामनराव हर्षे होते. एक दाम्पत्य दुकानात आले. त्यांनी २४.६७० ग्रॅम वजनाची ‘हॉलमार्क’ प्रमाणित सोन्याची साखळी विक्री करून एक काळी पोत, दोन अंगठ्या व दोन जोड कर्णफुले असे एकूण १ लाख ४५ हजार ५९० रुपयांचे दागिने खरेदी केले. साखळीवर हॉलमार्क ९१६ असे चिन्ह होते. त्यामुळे संजय हर्षे यांना संशय आला नाही. या साखळीचे सोन्याच्या चालू बाजारभावाप्रमाणे १ लाख ५१ हजार ८९० रुपये झाले. उर्वरित ६ हजार ३०० रुपये हर्षे यांनी संबंधित दाम्पत्यास परत केले. दरम्यान, नंतर साखळीची एक कडी कापून वितळली असता ती बनावट निघाली. त्यानंतर अक्षय हर्षे यांनी गडचिरोली पोलिस स्टेशन येथे तक्रार केली. खोटे दागिने देऊन फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याने अयोध्यानगर येथे राहत असल्याचे सांगितले होते. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज व साखळी अक्षय हर्षे यांनी गडचिरोली पोलिसांना दिली आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित दाम्पत्याचा शोध घेऊन चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात गडचिरोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे म्हणाले की, सराफा व्यावसायिकाने तक्रार केली आहे. मात्र, त्या साखळीवरील हॉलमार्क चिन्हाबाबत खातरजमा करणे सुरू आहे. हे दागिने पूर्णत: बनावट आहेत की नाहीत, हे पडताळणीनंतर समोर येईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.










