ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १२ : बलोपासनेसह सेवा, समर्पणाचा संदेश आपल्या श्रीरामभक्तीतून देणारे ‘भीमरूपी महारुद्र, वज्रहनुमान मारुती’ अर्थात श्री हनुमंताची मंदिरे अनेक गावांच्या वेशीवर असतात. पण गडचिरोली शहराच्या वेशीवर असलेले श्री श्रेत्र सेमाना देवस्थान केवळ गडचिरोलीकरच नव्हे तर जिल्हा व महाराष्ट्रासह इतर राज्यांतील हनुमंतभक्तांचे आवडते श्रद्धास्थान आहे. श्री हनुमान जयंतीनिमित्त येथे भाविकांची मांदियाळी जमली आहे
गडचिरोली शहराच्या सिमेवरील गडचिरोली-चामोर्शी मार्गावर हे देखणे मंदिर आहे. असे म्हणतात की, गडचिरोली शहराच्या सिमेवर येथील श्री हनुमंताची मूर्ती प्रकट झाली होती. त्यामुळे हे स्वयंभू हनुमान मंदिर मानले जाते. या हनुमंताला सांगितलेली मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे हनुमान जयंतीसह इतर दिवशी विशेषत: मंगळवार व शनिवार येथे हनुमान भक्तींची प्रचंड गर्दी असते. विशेष म्हणजे श्री हनुमान मंदिरासह येथे विविध देवतांची मंदिरे आहेत. श्री सेमाना हनुमंत मूर्तीच्या बाजुलाच श्री साई साईबाबांचीसुद्धा मूर्ती आहे. याच मंदिराच्या बाजुला भगवान श्री महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या बाजुला औदुंबर वृक्षाखाली श्री दत्तात्रेयाचे छोटेखानी मंदिर आहे. इथून पुढं जाताच डाव्या बाजुला पुन्हा एक हनुमंताचे मंदिर आहे. मात्र इथली मूर्ती मूर्तीकाराकडून घडवलेली आहे. तर मुख्य मंिदरातील मूर्ती स्वयंभू प्रकट झाली आहे. याशिवाय थोड्या अंतरावर श्री शनिदेवही विराजमान असून महामार्गालगत श्री हनुमंताची भव्य उंच उभी मूर्ती अतिशय लक्षवेधक आहे.
श्री हनुमंत जन्मोत्सवानिमित्त शनिवारी सेमाना देवस्थानाच्या मागे असलेल्या श्री बटेश्वर महादेव गोशाळा, संत सेवा आश्रमच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा लाभ भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्री बटेश्वर महादेव गोशाळा तथा संत सेवा आश्रमाचे संचालक प्रफुल्ल बिजवे यांनी केले आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही शनिवार (ता. १२) हनुमंत भक्तांची गर्दी उसळणार आहे. त्यादृष्टीने आम्ही नियोजन केले आहे. शुक्रवारी (ता. ११) रात्री भजन राहिल, पहाटे ४ वाजता श्री हनुमंताची आरती होईल, सकाळी ११ वाजतापासून भक्तांसाठी महाप्रसाद वितरण करण्यात येईल. शिवाय मंडप, पाणी आदींची व्यवस्था केली आहे. श्री हनुमंताची कृपा गडचिरोलीकरांवर सदैव राहिल.
– रामस्वरूप काबरा, अध्यक्ष, श्री क्षेत्र सेमाना देवस्थान, गडचिरोली
————————










