लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) विक्रम मेहता यांना वेटरन्स अचिव्हमेंट पुरस्कार

443

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता.१८, : लॉइड्स मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लि. चे निवासी संचालक लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) विक्रम मेहता यांना सदर्न कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते वेटरन्स अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) विक्रम मेहता यांना हा पुरस्कार सुरजागड लोहखनिज खाण कार्यान्वित करण्यासाठी केलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. लॉइड्स मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लि. चे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीतून आणि नेतृत्वाखाली लेफ्टनंट कर्नल मेहतांनी नक्षलप्रभावित भागात शांती व विकासाचे नवीन पर्व घडवून आणले. या कार्यक्रमात भंडारा जिल्ह्याचे मूळ रहिवासी आणि सध्या गडचिरोलीतील गोंडवाना सैनिक विद्यालयाशी संबंधित सुभेदार मेजर ऋषी वंजारी आणि नागपूरचे नीलेश व्यास यांनाही गौरविण्यात आले. याप्रसंगी, ले. कर्नल मेहता यांनी श्री. प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली संकलित ‘गडचिरोली कॉफी टेबल बुक’ ची एक प्रतीकात्मक प्रत आर्मी कमांडर यांना सुपूर्द केली आणि गडचिरोलीतील सकारात्मक बदल प्रत्यक्ष पाहण्यासाठी आमंत्रित केले. या कार्यक्रमाचे आयोजन मेजर जनरल संजयकुमार विद्याथी, जनरल ऑफिसर कमांडिंग, उत्तर महाराष्ट्र व गुजरात उपक्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.