गडचिरोलीत सुरू झाले नगरपालिका क्षेत्रातील राज्यातले पहिले मॉडेल सिनेमा थिएटर .

183

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २२ : राज्यातील नगरपालिका क्षेत्रात पहिल्यांदाच गडचिरोली शहरात वातानुकूलित मोबाईल सिनेमा थिएटर सुरू करण्यात आले आहे. या थिएटरचा उद्घाटन सोहळा गुरुवार (ता. २२)आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, प्रमोद पिपरे, सूरजीत रॉय, अनिल कुनघाडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी पंडा म्हणाले की, जिल्हा नियोजन विकास निधीतून या सिनेमागृहासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून नगर परिषदेच्या माध्यमातून हे सिनेमागृह उभारण्यात आले आहे. या सिनेमागृहात पुढील टप्प्यात किड्स झोन, फूड कोर्ट आणि विविध सुविधा सुरू करण्यात येणार असून या सिनेमा गृहाला मॉडेल सिनेमा थिएटर म्हणून विकसित केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले की, हे सिनेमा थिएटर गडचिरोलीच्या सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रात मानाचा तुरा ठरेल. येथे केवळ करमणूकप्रधानच नव्हे, तर सामाजिक प्रबोधन करणारे चित्रपटही दाखवण्यात येणार आहेत, जे समाजाला सकारात्मक संदेश देतील.मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी हे सिनेमा गृह अल्पावधीत उभे राहण्यासाठी आमदार डॉ. नरोटे व जिल्हाधिकारी पंडांचे सहकार्य मोलाचे ठरल्याचे नमूद केले. त्यांनी येत्या काळात इतर पूरक सुविधा लवकरच उभारण्यात येतील असेही सांगितले. हे सिनेमा थिएटर विशेष प्रकारच्या हवेने फुगवलेल्या तंबूमध्ये तयार करण्यात आले असून त्यात वातानुकूलनाची सुविधा आहे. यामध्ये एकूण १२० प्रेक्षक बसण्याची व्यवस्था असून दररोज चार शो दाखविण्यात येणार आहेत. संचालन आनंद खुने यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गणेश ठाकरे यांनी मानले.

—————————————