Home Gadchiroli १२ कुख्यात माओवाद्यांचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शस्त्रांसह आत्मसमर्पण

१२ कुख्यात माओवाद्यांचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शस्त्रांसह आत्मसमर्पण

152

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ६ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज ६ जून २०२५ रोजी थेट महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात पोहोचले. या अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात जाणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यांच्या उपस्थितीत आज कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या १२ माओवाद्यांनी शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. माओवाद्यांनी शस्त्रांसहआत्मसमर्पण करण्याची अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पित माओवाद्यांमध्ये १) सपना ऊर्फ सपनाक्का ऊर्फ स्वप्ना ऊर्फ पापक्का बुचय्या चौधरी (डिव्हीसीएम, इंद्रावती एरीया) वय ५५ वर्षे, रा. वेलगूर ता. अहेरी, जि. गडचिरोली, २) रामदास ऊर्फ झिटकुराम ऊर्फ चिन्नाजी ऊर्फ सोमाजी ऊर्फ रामजी मटकुवरसिंग हलामी, (डिव्हीसीएम, कुतुल एरीया कमिटी (कृषी विभाग)), वय ५५ वर्ष, रा. कवडीकसा, ता. धानोरा, जि. गडचिरोली, ३) शिवलाल ऊर्फ सुकलु सनकू पदा(डिव्हीसीएम, कुतुल दलम (कृषी विभाग)), वय ६० वर्ष, रा. गुर्रेकसा, ता. धानोरा, जि. गडचिरोली, ४) पुष्पा ऊर्फ शामबत्ती नांगसाय होळी (डिव्हीसीएम, कुतुल एरीया कमिटी (कृषी विभाग)) वय ५५ वर्षे, रा. गुर्रेकसा ता. धानोरा, जि. गडचिरोली, ५) कोसा कुम्मा गोटा (कमांडर, कुतुल दलम), वय ३५ वर्षे, रा. कस्तुरमेट्टा, तह. ओरच्छा, जि. नारायणपूर (छ.ग.), ६) दुर्गी ऊर्फ रम्मी चिन्ना विडपी, (उप-कमांडर, अहेरी दलम) वय ३५ वर्षे, रा. होडरी, ता. भामरागड, जि. गडचिरोली, ७) अजय ऊर्फ भीमा सोमडू मुचाकी (उप-कमांडर, राही दलम) वय २७ वर्षे, रा. भुसापूर, पोस्ट उसुर, ता. मारूबाक, जि. बीजापूर (छ.ग.), ८) संगिता ऊर्फ मसरी दोगे आत्राम (एसीएम, सप्लाय टिम), वय ४० वर्ष, रा. रामय्यापेठा, ता. अहेरी, जि. गडचिरोली ९) सविता ऊर्फ सुनिता भिमा नरोटे (एसीएम, भामरागड दलम), वय ३५ वर्ष, रा. पिपली बुर्गी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, १०) अंजु ऊर्फ छाया दसरु वड्डे (एसीएम, पश्चिम सब झोनल टेलर टिम) वय २५ वर्षे, रा. झुरी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली ११) अरुणा ऊर्फ सोमारी ऊर्फ प्रिती येर्रा तलांडी (एसीएम, डॉक्टर टिम) वय ३० वर्षे, रा. जिंजगाव, तह. भामरागड, जि. गडचिरोली व १२) दिलीप ऊर्फ सुधाकर कारु मोहंदा (सदस्य, कंपनी क्र. १०) वय २८ वर्षे, रा. मुरंगल, ता. भामरागड, जि. गडचिरोली यांचा समावेश आहे.

यापूर्वी आत्मसमर्पण केलेल्या १३ पूर्वाश्रमीच्या माओवाद्यांचा सामूहिक विवाह सोहळाही गडचिरोलीत आयोजित करण्यात आला होता, त्याला हजेरी लावत त्यांनी नवदाम्पत्यांना नवजीवनाच्या शुभेच्छा दिल्या. सायंकाळी त्यांनी सी-६० जवानांचा सत्कार केला आणि त्यांना अत्याधुनिक अशी एके-१०३ शस्त्रे आणि एएसएमआय पिस्तुल, बुलेटप्रुफ जॅकेट्स प्रदान केली. त्यांच्या शौर्याची प्रशंसाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. जिल्हा नियोजन विकास निधीतून १९ चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. त्यातील काही बुलेटप्रुफ वाहने आहेत. त्यांच्या चाव्या त्यांनी पोलिस दलाकडे सुपूर्द केल्या. या दौर्‍यात मंत्री आशीष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, पोलिस उपमहानिरीक्षक अंकीत गोयल, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल आदी मान्यवर उपस्थित होते.सी-६० जवानांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज कवंडे आऊटपोस्टला मी भेट दिली आणि गावकर्‍यांशी संवाद साधला. आपल्या पोलिस दलाने अवघ्या २४ तासांत कवंडे आऊटपोस्टचे निर्माण केले. हे केवळ पोलिस ठाणे नाही, तर शासन प्रशासन जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम आहे. जेथे सुरक्षेची कमतरता होती, तेथे पोलिस ठाणे उघडत शासन-प्रशासन जनतेपर्यंत पोहोचविले जात आहे. गेल्या दोन वर्षांत अशा ६ आऊटपोस्ट तयार केल्या. गेल्या दीड वर्षांत २८ माओवाद्यांना मारले, ३१ माओवाद्यांना अटक झाली, तर ४४ माओवाद्यांनी शरणागती पत्करली. हा एक नवीन रेकॉर्ड आहे. ज्यांच्यावर खूप मोठ्या रकमेची बक्षीसं होती, असेही अनेक आता माओवाद सोडून सामान्य जीवनात परत येत आहेत. आपली ही लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. मार्च २०२६ पर्यंत माओवादाचा खात्मा करायचा, हे आपले टार्गेट आहे. महाराष्ट्रात ४ वर्षांपासून नक्षल भरती पूर्णपणे थांबली होती. पण, अन्य राज्यातून ती व्हायची. पण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अतिशय कठोर पाऊले उचलली आणि आता नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर आहे, असेही ते म्हणाले. आज १२ माओवाद्यांनी शरणागती पत्करली. त्यांच्यावर १ कोटी रुपयांपेक्षा अधिकचे बक्षीस होते. त्यांनी अत्याधुनिक शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे. त्यांना भारताच्या संविधानाची प्रत आज आपण भेट दिली. लॉईडसारख्या उद्योगांनी पुनर्वसनात मोठा हातभार लावला आहे. हा जिल्हा रोजगारयुक्त करायचा आणि भारताचे पोलाद शहर म्हणून तो विकास करायचा आहे. हे करताना येथील निसर्गसंपदा, जल, जमीन, जंगल कायम ठेवूनच हा विकास करण्याचा शासनाचा निर्धार आहे.नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील पूल एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरणार आहे. दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटी सुधारून विकासाची गंगा पोहोचवणे, हा शासनाचा दृढ निर्धार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ड्रोनच्या मदतीने त्यांनी या पुलाची पाहणी केली.