जिल्ह्यातील ४२०० विद्यार्थ्यांनी दिला सराव पेपर

54

गडचिरोली, ता. ६ : जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव आहे. तसेच दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल असलेल्या अज्ञानामुळे, त्यांना मिळत नसलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेत मागे पडत आहेत. याकरिता शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धा परीक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी, त्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी व त्यांचा स्पर्धा परीक्षेकडे कल वाढावा तसेच त्यांना स्पर्धा परीक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलिस दल पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत काही दिवसांनी सुरू होणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार (ता. ५) गडचिरोली पोलिस मुख्यालय येथील शहीद पांडू आलाम सभागृह तसेच एक गाव एक वाचनालयाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र आदी ठिकाणी उभारण्यात आलेल्या ७१ वाचनालयांमध्ये मोफत स्पर्धा परीक्षा सराव पेपर क्र. ७ चे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील ४२०० विद्यार्थ्यांनी हा सराव पेपर दिला.

या सराव पेपरचा उपयोग विद्यार्थ्यांना येणाऱ्या पोलिस शिपाई भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षेकरिता होणार आहे. यावेळी या स्पर्धा परीक्षा सराव पेपरकरिता पोलिस मुख्यालय व विविध पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र स्तरावरून एकूण ४२०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा या ठिकाणी ही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच विशेष बाब म्हणजे नव्याने उभारण्यात आलेल्या पेनगुंडा पोलिस मदत केंद्र हद्दीतील २०, नेलगुंडा पोलिस स्टेशन हद्दीतील १५ व कवंडे पोलिस स्टेशन हद्दीतील ५ विद्यार्थ्यांनीही या सराव पेपरमध्ये सहभाग घेतला. अनेक ठिकाणी सार्वजनिक वाचनालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या. स्थानिक शहीद पांडू आलाम सभागृहामध्ये घेतलेल्या सराव पेपरमध्ये १८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सराव पेपर प्रसंगी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांचे मनोबल वाढविले. या कार्यक्रमासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनात पोलिस उप अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्राचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके व सर्व पोलिस अंमलदारांनी सहकार्य केले.

——————————-