गडचिरोली, ता. ६ : जिल्ह्यातील चामोर्शी येथील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षक आणि व्यवस्थापनावर गंभीर आरोप करीत समाजमाध्यमावर व्हिडीओ टाकून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनिकेत गजेंद्र सोनटक्के (वय २२) रा. आरमोरी, असे विद्यार्थ्याचे नाव असून त्याने आत्महत्या करीत असल्यासंदर्भातले पत्र व चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित केली होती. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे उपचार सुरू आहे.
शनिवार (ता. ५) केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात पदवीच्या तृतीय वर्षाला शिकणाऱ्या अनिकेत गजेंद्र सोनटक्के या विद्यार्थ्याची चित्रफित आणि पत्र समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाले. यात त्याने महाविद्यालय प्रशासनाकडून होत असलेल्या छळामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी तुषार भांडारकर, पवन बुधबावरे आणि व्यवस्थापनाकडून अनेक दिवसांपासून मानसिक त्रास सुरू आहे. विरोध केल्यास अनुत्तीर्ण करण्याची धमकी देण्यात येते. शिक्षकवर्गाकडून विद्यार्थ्यांचे शोषण केले जात आहे. कमी गुण देऊन त्यांच्या भविष्याशी खेळले जात आहे, असे गंभीर आरोप त्याने केले आहे. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून मानसिक स्थिती बघता डॉक्टरांनी ६ जुलै रोजी पोलिसांना बयाण घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रुग्णालयाबाहेर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ही बाब आपल्याला काल रात्रीच्या सुमारास कळली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती संस्थापक अरुण हरडे यांनी दिली.
————————————










