ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १६ : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अहेरीपासून अतिदुर्गम मरकणार या गावापर्यंत राज्य परीवहन महामंडळाची बससेवा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे याच वर्षी १ जानेवारी २०२५ रोजी गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी बससेवा तसेच २७ एप्रिल २०२५ रोजी कटेझरी ते गडचिरोली बससेवादेखील सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या दुर्गम भागात मागील पाच वर्षांमध्ये ४२०.९५ कि.मी. लांबीच्या एकूण २० रस्त्यांसोबतच एकूण ६० पुलांचे बांधकाम पोलिस संरक्षणात पूर्ण करण्यात आले आहे. याप्रमाणेच भामरागड उपविभागातील छत्तीसगड सिमेपासून अवघ्या ६ किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम मरकनार येथील नागरिकांना प्रवासाचे साधन उपलब्ध होऊन त्यांना तहसील किंवा जिल्ह्राच्या ठिकाणी सहज प्रवास करता यावा यासाठी बुधवार (ता. १६) गडचिरोली पोलिस दलाच्या प्रयत्नाने व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, गडचिरोली यांच्या सहकार्याने मरकणार ते अहेरी बससेवेला स्वातंत्र्यानंतर प्रथमच सुरुवात करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड उपविभागातील अबुझमाडच्या पायथ्याशी असलेल्या अतिदुर्गम मरकणार या गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच बस आल्यामुळे भागातील नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवत जल्लोषात बसचे स्वागत केले. मरकणार गावचे गाव पाटील झुरू मालू मट्टामी यांनी या बस सेवेचे उद्घाटन केले. तसेच यावेळी सीआरपीएफ ३७ बटालियन जी कंपनीचे असिस्टंट कमांडंट अविनाश चौधरी तसेच पोलिस स्टेशन, कोठीचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दिलीप गवळी यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली. यावेळी पोलिस दलामार्फत उपस्थित नागरिकांना मिठाईचे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने राबविण्यात आलेल्या नागरी कृती उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मरकणार गावातील नागरिकांनी एकमताने ९ फेब्रुवारी २०२५ रोजी नक्षल गावबंदी ठराव संमत करून माओवाद्यांना कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही असे घोषित केले होते. या अतिदुर्गम भागातील नागरिकांचा विकास होण्यासाठी गतवर्षी पोलिस संरक्षणात कोठी ते मरकणार रस्ता तयार करण्यात आला असून मरकणार ते मुरूमभुशी रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी मरकणार गावात एअरटेल टॉवरचे बांधकाम करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांसाठी यापुर्वी कोणत्याही प्रकारची प्रवासाची सुविधा उपलब्ध नसल्यामूळे मरकनार तसेच आसपासच्या गावातील नागरिकांना कोठीपर्यंत पायी जाऊन बससेवेचा लाभ घ्यावा लागत असे. या भागात बससेवा सुरू झाल्यामुळे याचा लाभ मरकणार, मुरूमभुशी, फुलनार, कोपर्शी, पोयारकोठी, गुंडूरवाही या गावातील जवळपास १२०० हुन अधिक नागरिक, रुग्ण, विद्यार्थी, प्रवासी यांना होणार आहे. या मार्गावरील एस.टी बसच्या सुविधेमुळे ग्रामस्थांना वर्षभर सहज प्रवास करता येईल. तसेच पोलिस व जनता यांचे संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होईल. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक, गडचिरोली (प्रशासन) गोकुळ राज जी. पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलिस अधिकारी, भामरागड अमर मोहिते, यांच्या मार्गदर्शनात कोठी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप गवळी व सीआरपीएफ आणि जिल्हा पोलिस दलाचे अधिकारी व अंमलदारांच्या प्रयत्नांनी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
———————————–










