मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांच्या वतीने काँग्रेस जनतेला देणार लॉलीपॉप व चॉकलेट

67

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारल्यानंतर प्रत्यक्ष विकास न करता विकासाच्या लोणकढी थापा मारत जिल्ह्यातील समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप करत गडचिरोली जिल्हा काँग्रेसने त्यांचा वाढदिवस ‘लॉलीपॉप आणि चॉकलेट’ वाटून साजरा करणार, असे जाहीर केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला क्रमांक एकचा जिल्हा बनवणार अशी घोषणा करून पालकत्व स्वतःकडे ठेवले. मात्र, त्यांना जिल्ह्यातील सामान्य नागरिकांसाठी वेळ नाही. आजपर्यंत त्यांनी केलेल्या दौऱ्यांमध्ये येथील नागरिक, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते यांच्याशी संवाद साधलेला नाही. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला. वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. डिमांड भरूनही शेतकऱ्यांना मीटर उपलब्ध करून देण्यात येत नाही. कर्जमाफी आणि बोनससाठी त्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागते. घरकुलाचे हप्ते थकले आहेत. रोजगाराच्या नावाखाली बळजबरी अधिग्रहण करण्यात येत आहे. वृक्षतोडीचा विरोध केल्यास प्रशासनाकडून दडपशाही करण्यात येते. रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. लोहखनिजाच्या बेदरकार वाहतुकीमुळे सामान्य नागरिकांचा बळी जात आहे. एसटी उपलब्ध नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे. एवढे गंभीर प्रश्न असतानासुद्धा पालकमंत्री याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आम्ही या सर्व पीडित नागरिकांना मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी लॉलीपॉप आणि चॉकलेट वाटप करणार असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केले आहे. दरम्यान २२ जुलै रोजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. सोबतच हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी राज्य शासनाने एक कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट दिले असून या उपक्रमाचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. काँग्रेसच्या या वैशिष्ट्यपूर्ण आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस काय भाष्य करतात, याबद्दलची उत्सूकता वाढली आहे.

————–