गडचिरोली राज्यातील टॉप-१० जिल्ह्यांमध्ये असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनसरी येथे महाराष्ट्रातील मेगा इंटिग्रेटेड स्टील प्लांटची पायाभरणी

46

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २२ : लॉयड्स मेटल्सने जिल्ह्यात औद्योगिकीकरण सुरू केल्यापासून गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक-आर्थिक परिवर्तन होत आहे. ज्या वेगाने सकारात्मक बदल होत आहेत, त्यामुळे पुढील पाच वर्षांत गडचिरोली महाराष्ट्रातील टॉप-१० जिल्ह्यांमध्ये येईल. ४.५ एमटीपीए क्षमतेच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाची पायाभरणी ही त्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मंगळवार (ता. २२) कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) ने आयोजित केलेल्या भव्य समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशीष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डाॅ. मिलिंद नरोटे, आमदार डॉ. परिणय फुके, लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, पोलिस महानिरीक्षक (नक्षलवादविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलिस उप महानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे, ‘पद्मश्री’ तुलसी मुंडा, रमेश बारसागडे, बाबूराव कोहळे, प्रशांत वाघरे, रवींद्र ओल्लालवार आदी उपस्थित होते. एलएमईएल स्टील प्लांटची पायाभरणी करण्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोनसरी येथे एलएमईएलच्या ४ एमटीपीए पेलेट प्रकल्पाचे, ८५ किमी स्लरी पाइपलाइनचे, आणि हेडरी येथील लोहखनिज ग्राइंडिंग युनिटचे ई-उद्घाटन केले. त्यांनी सोमनपल्ली वसाहत, कोनसरी येथील प्रस्तावित १०० खाटांचे रुग्णालय आणि सीबीएसई-पद्धतीच्या शाळेचीही पायाभरणी केली.

या ऐतिहासिक सोहोळ्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागांतून हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या या भागात औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करणे हे त्यांचे आणि गडचिरोलीतील लोकांचे स्वप्न सत्यात उतरले आहे. जिल्ह्यात लोहखनिजाचे समृद्ध साठे आणि येत्या ३० महिन्यांत तयार होऊ घातलेल्या एकात्मिक पोलाद प्रकल्पामुळे भारत लवकरच चिनशी स्पर्धा करू शकेल. एलएमईएल आणि गडचिरोलीतील लोक एकत्र प्रगती करीत आहेत याचा मला आनंद आहे. आतापर्यंत १४,००० लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. स्टील प्लांटमुळे २०,००० अतिरिक्त नोकऱ्या निर्माण होतील, असेही ते म्हणाले. गडचिरोलीमध्ये दुय्यम पोलाद प्रकल्प सुरू झाल्यानंतर एक स्टील क्लस्टर विकसित होईल.“चांगल्या दर्जाच्या आणि कमी किमतीच्या ग्रीन स्टीलसह चीनशी स्पर्धा करण्यासाठी आम्ही श्री. प्रभाकरन यांना सर्वप्रकारे सहकार्य देऊ, असेही ते म्हणाले. शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांना प्रशिक्षण देण्याच्या आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी नोकऱ्या देण्याच्या एलएमईएलच्या उपक्रमाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

व्होल्वो पेलेट ट्रकच्या महिला चालकांचे कौतुक करून आणि त्यांना ‘पोलादी महिला’ असे वर्णन करून मुख्यमंत्र्यांनी एलएमईएलने महिलांना घरकाम, नंतर हलके मोटार वाहन चालविण्याचे आणि नंतर जड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यामुळे त्यांच्या उत्पन्नात १२ रुपयांपासून ५५ हजार रुपयांपर्यंत वाढ झाली असून त्यांच्या आर्थिक स्थैर्यात सकारात्मक बदल घडले आहेत तसेच त्यांची प्रतिष्ठा उंचावली आहे, असेही ते म्हणाले. लोहखनिज वाहतुकीत कार्बन उत्सर्जन कमी करणारी स्लरी पाइपलाइन, पेलेट प्लांट, हिरव्या वाहनांचा ताफा यासारख्या उपक्रमांमुळे गडचिरोलीचा विकास पर्यावरणपूरक झाला आहे, असेही ते म्हणाले. गडचिरोली हा महाराष्ट्रातील सर्वात हिरवागार जिल्हा आहे. औद्योगिकरण होत असतानासुद्धा आम्हाला ही ओळख कायम ठेवायची आहे. म्हणूनच, आम्ही दोन वर्षांत एक कोटी झाडे लावण्याचा प्रण केला आहे. गडचिरोलीमध्ये राजामुंद्रीसारखी उच्च गुणवत्ता रोपवाटिका उभारण्याच्या त्यांच्या सूचनेवर काम केल्याबद्दल त्यांनी एलएमईएलचे कौतुक केले.

कर्टिन विद्यापीठाच्या सहकार्याने गोंडवाना विद्यापीठात स्थापन करण्यात आलेला युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कर्टिन विद्यापीठात गडचिरोलीतील तरुणांच्या उच्च शिक्षणासाठी प्रायोजित कार्यक्रम यासारख्या विविध उपक्रमांसाठी त्यांनी श्री. प्रभाकरन यांचे कौतुक केले. भविष्यात, भारतातील सर्वोत्तम खाण अभियंते गडचिरोलीतील असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या भाषणात व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन म्हणाले की एकात्मिक पोलाद प्रकल्पाचे काम ३० महिन्यांत पूर्ण होईल आणि मुख्यमंत्र्यांना त्याच्या उद्घाटनासाठी येण्याचे आवाहन केले. त्यापूर्वी, आम्हाला अतिविशेषोपचार रुग्णालय आणि शाळा यांचे काम पूर्ण करायचे आहे. सरकारच्या सहकार्याने, आम्ही पोलाद गुणवत्तेत आणि दर्जामध्ये चीनशी स्पर्धा करू शकतो, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. स्थानिक लोकांशी भावनिक संबंध जोडत श्री. प्रभाकरन यांनी त्यांचे बहुतेक भाषण मराठीत केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे कौतुक केले. आम्ही मिळून गडचिरोलीची यशोगाथा रचली आहे, असे ते मराठीत म्हणाले. त्यांनी कंपनीच्या गडचिरोलीतील आतापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की एलएमईएलने प्रशिक्षित केलेल्या १,५०० लोकांना एलटी गोंडवाना मार्फत रोजगार मिळाला आहे आणि आणखी ३,००० लोकांना प्रशिक्षण दिले जात आहे. ईएसओपी अंतर्गत, आतापर्यंत कामगारांसह १०,६०० कर्मचाऱ्यांना कंपनीचे समभाग मिळाले आहेत ज्यामुळे ते केवळ कामगारच नाहीत तर कंपनीचे भागधारक देखील बनले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एलएमईएलमध्ये सामील झालेल्या एकूण १ ४०० तरुणांपैकी चार तरुणांना नियुक्ती पत्रे प्रदान केली. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनने प्रायोजित केलेल्या कर्टिन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवडलेल्या तिसऱ्या तुकडीच्या सहा उमेदवारांना त्यांनी बोर्डिंग पास देखील प्रदान केला. युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतलेल्या ५० पैकी पाच विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रे देखील प्रदान केली. त्यांनी एकूण ६०० कामगारांपैकी पाच जणांना कर्मचारी स्टॉक ऑप्शन समभाग प्रमाणपत्रे प्रदान केली. तसेच त्यांनी ‘लॉयड्स अँथम’ लाँच केले, जे या प्रसंगी वाजवले गेले आणि लोकांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.