मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आयर्न वुमन’ कार्यक्रमाची सुरुवात

54

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार (ता. २२) लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या खनिज वाहतुकीतील उत्सर्जन कमी व्हावे ह्या दृष्टिकोनाचा भाग म्हणून नऊ व्होल्वो एफएम ४२० एलएनजी ट्रकवरील लोहखनिज पेलेटच्या पहिल्या खेपेला हिरवी झेंडी दाखवली आणि एलएमईएलने व्होल्वो ट्रक्स इंडियासोबत हाती घेतलेल्या ‘आयर्न वुमन’ उपक्रमाचा प्रारंभ केला. गडचिरोलीतील माझ्या बहिणी जिल्ह्यात सकारात्मक सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचे चेहरे म्हणून उदयास येत आहेत हे मला कौतुकास्पद वाटते. जेव्हा एका ‘आयर्न वुमन’ सहभागीने मला सांगितले की ती सुरुवातीला एलएमईएलमध्ये हाऊसकीपिंगचे काम करीत होती, पण त्यानंतर कंपनीने तिला हलके मोटार वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले आणि आता ती एलएनजी ट्रक चालवत आहे तेव्हा मला अभिमान वाटला. कारण यामुळे तिचा आत्मविश्वासच वाढला नाही तर तिला मिळणाऱ्या पगारात १२ हजार रुपयांवरून आता ५५ हजार रुपयांपर्यंत वाढ मिळण्यास सक्षम केले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री अ‍ॅड. आशीष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. परिणय फुके, एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन, व्होल्वो ट्रक्स इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष बोद्दपती दिनकर प्रामुख्याने उपस्थित होते. श्री. प्रभाकरन म्हणाले की, लॉयड्स मेटल्सचा विश्वास आहे की व्यावसायिक प्रगती ही सामाजिक-आर्थिक विकास, महिला सक्षमीकरण आणि समावेशक आणि वैविध्यपूर्ण कार्यबल यांच्यासोबतच पुढे जावी. व्होल्वो एलएनजी ट्रक्ससह ‘आयर्न वुमन’ कार्यक्रम हा सक्षमीकरण आणि प्रगती दोन्हीला चालना देणाऱ्या सुलभ, तंत्रज्ञान-सक्षम संधी निर्माण करण्यासाठीचा महत्वाचा उपक्रम आहे, असेही ते म्हणाले. खनिज क्षेत्रातील दळणवळणात अर्थपूर्ण बदल घडवून आणून नवीन मानके स्थापित केल्याबद्दल आम्ही लॉयड्स मेटल्सचे कौतुक करतो, असे बोद्दपती दिनकर म्हणाले. ‘आयर्न वुमन’ उपक्रम हा खनिज क्षेत्रात स्थानिक महिलांना अवजड वाहने चालविण्यासाठी सक्षम करण्यासाठी एक अग्रगण्य चालक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. हा उपक्रम भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील समावेशक आणि वैविध्यपूर्ण कार्यबल विकासातील एक नवीन अध्याय आहे, असेही मान्यवर म्हणाले.

———————————