Home Gadchiroli बंदूकीचा धाक दाखवून ट्रक चालकाकडून लूटणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या

बंदूकीचा धाक दाखवून ट्रक चालकाकडून लूटणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या

91

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २४ : जिल्ह्यातील सावरगाव-मुरुमगाव मार्गावर ट्रक चालकास बंदूकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार ट्रकचालक रामभरोसे सीताराम हा सावरगाव-मुरुमगाव रोड येथे ट्रक चिखलात फसल्याने रात्री ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपलेला असताना रात्री १.३० ते २ वाजता दरम्यान तीन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी ट्रक चालकास ट्रकच्या कॅबीनमधून उठवून बंदुकीचा धाक दाखवत ट्रकमधून डिझेल काढून देण्यासाठी धमकी दिली. परंतु डिझेल काढता न आल्याने आरोपींनी फिर्यादीच्या छातीवर व डोक्यावर दोन बंदुक ठेवून फिर्यादीचा मोबाईल जबरीने काढून घेतला व कोणाला सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी देऊन पसार झाले. या घटनेच्या अनुषंगाने फिर्यादीने दिलेल्या माहितीवरून मुरूमगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी तातडीने तपास करण्याचे आदेश सावरगाव पोलिसांना दिले होते. पोलिस उपनिरीक्षक विश्वंभर कराळे आणि पोलिस पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने व साक्षीदारांच्या जबाबावरून गजामेंढी ता. धानोरा जि. गडचिरोली येथून तीन संशयीत आरोपी अशोक सुखराम बोगा ( वय ३०), घुमनसाय बैजुराम गावडे ( वय ३३), सुकालू आसाराम कोमरा ( वय ३२) तिघेही रा. गजामेंढी, ता. धानोरा, जि. गडचिरोली ताब्यात घेतले. यादरम्यान पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुल केले व या गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही बंदुका छत्तीसगड राज्यातील बसंतकुमार कल्लो याने दुरुस्तीसाठी आपल्याकडे दिल्याचे सांगितले. यावरून गडचिरोली पोलीसांनी बसंतकुमार कल्लो ( वय ४१) रा. नवागाव कोंडल, ता. दुर्ग, जि. कांकेर, छत्तीसगड याच्यासह सर्व चारही आरोपींना अटक केली. न्यायालयाने चारही आरोपींना शनिवार (ता. २६) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून २ नग देशी बनावटीच्या बंदुक, ११ नग काडतुस फिर्यादीचा चोरीस गेलेला मोबाईल फोन व गुन्ह्यात वापलेली मोटारसायकल जप्त केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विश्वंबर कराळे करत आहेत.

——————————————