ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २५ : जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्राच प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी गुरुवार (ता. २४) कुरखेडा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या मालेवाडा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थाची साठवणूक करून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक केली. धनेगाव व कातलवाडा येथे ही अंमली पदार्थविरोधी कारवाई करण्यात आली आहे.
धनेगाव येथे राहणारा कालीदास पांडुरंग मोहुर्ले याने त्याच्या राहत्या घरी अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा) बाळगून विक्रीकरिता साठवून ठेवला आहे. अशा गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, सहायक पोलिस निरीक्षक समाधान दौड हे पोलिस पथकासह धनेगाव येथे रवाना झाले. कालीदास मोहुर्लेच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये दोन पोत्यांमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाचा अंमली पदार्थ (गांजा) आढळला. एकूण ४ लाख ८ हजार २५० रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. आरोपीकडे या अंमली पदार्थाबाबत अधिक विचारणा केली असता विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या घरामध्ये हा अंमली पदार्थ साठवून ठेवल्याचे त्याने कबूल केले. यासोबतच या कारवाई दरम्यान कातलवाडा येथील तारेश्वर भुपाल चांग याने त्याचे वडील भुपाल चांग याच्या राहत्या घरी अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा) बाळगून विक्रीकरिता साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने भुपाल चांगच्या घरी पोहचून ९६ हजार ६७८ रुपयांचा गांजा जप्त केला. कालीदास पांडुरंग मोहुर्ले (वय ४०) रा. धनेगाव, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, तारेश्वर भुपाल चांग ( वय ३४) रा. कातलवाडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली यांच्या विरुद्ध पुराडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश नाईकवाडे करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक, गडचिरोली (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक समाधान दौड, भगतसिंग दुलत, महिला पोलिस उपनिरीक्षक सरिता मरकाम, पोलिस नाईक चौधरी, पोलिस अंमलदार गरफडे, गोंगले, पोलिस नाईक चव्हान, चालक पोलिस अंमलदार कोडापे, पोलिस अंमलदार दुधबळे, पंचफुलीवार, चालक पोलिस अंमलदार लोणारे आदींनी पार पाडली.










