ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ३० : जिल्ह्यातील हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल (एलकेएएम) रुग्णालयाची वैद्यकीय क्षमता आणि आरोग्यसेवेतील उत्कृष्टता अधोरेखित करणारी शुभ घटना घडली असून या रुग्णालयात सामान्य प्रसूतीद्वारे तब्बल ४.६३ किलो वजनाचे बाळ जन्मले. बाळ आणि आई दोघेही सुरक्षित आहेत. गडचिरोली भागातील हा सर्वात जास्त वजनाच्या बाळाचा सामान्य प्रसूतीद्वारे झालेला जन्म असू शकतो.
सामान्यत: ४ किलो आणि त्याहून अधिक वजनाची बाळे ‘मोठी’ मानली जातात. या प्रकरणात, बाळाचा जन्म गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथील सुंदरनगरच्या रहिवासी असलेल्या आईच्या पोटी झाला. रविवार (ता. २७) लॉयड्स काली अम्मल मेमोरियल रुग्णालयात आईने या बाळाला जन्म दिला. सिझेरियन सेक्शन किंवा एपीसिओटॉमी न करता बाळाचा सुरक्षित जन्म झाला. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) चे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्याकडून रुग्णालयाच्या चमूला सतत प्रेरणा मिळते. बी. प्रभाकरन याचा या प्रदेशात दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्यावर विशेष भर आहे. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या संचालक कीर्ती रेड्डी यांचेही एलकेएएम रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूला मार्गदर्शन आणि पाठबळ असते. आई आणि नवजात बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. एलकेएएम रुग्णालयामधील डॉक्टरांच्या मते, ‘शोल्डर डायस्टोसिया’ (बाळंतपणात गर्भाचा खांदा मातेच्या श्रोणिमध्ये अडकणे, ज्यामुळे बाळाला बाहेर येण्यास अडचणी निर्माण होतात) परीस्थिती असतानाही रुग्णालयाच्या तज्ज्ञ चमूने प्रसूती यशस्वीरित्या पार पाडली. यातून माता व बाळ सेवेतील उत्कृष्टतेसाठी रुग्णालयाची वचनबद्धता अधोरेखित होते. तसेच गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्येही रुग्णालयाची वैद्यकीय क्षमता उत्तम असल्याचे दर्शवते.
————————————————










