गडचिरोली, ता. १ : जिल्ह्यात २८ जूलै ते ३ ऑगस्ट दरम्यान माओवाद्यांकडून राबविल्या जाणाऱ्या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या नेतृत्वात माओवादविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असून सर्व पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्रांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे उपविभाग जिमलगट्टाअंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम दामरंचा उप पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांनी पोलिस दलाप्रति विश्वास दाखवित माओवाद्यांच्या सप्ताहादरम्यान एकूण ३ नग भरमार बंदूका व १ नग बंदुकीचे बॅरेल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
गडचिरोली जिल्ह्रात मोठ्या प्रमाणावर जंगलक्षेत्र असल्यामूळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपरिक शेती व्यवसायासोबतच शिकार करून उदरनिर्वाह करत असत. शिकार करण्यासाठी तसेच वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदूका बाळगत असत. अशा प्रकारच्या वडीलोपार्जित बंदूका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्रातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत. दुर्गम-अतिदुर्गम भागात माओवादी याच बाबींचा फायदा घेऊन, सर्वसामान्य जनतेला माओवादी चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. याकरिता पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक गडचिरोली (प्रशासन) गोकुल राज जी तसेच सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनात नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या बंदूका स्वेच्छेने गडचिरोली पोलिस दलाकडे स्वाधिन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. गडचिरोली पोलिस दलाच्या याच आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत माओवाद्यांच्या सप्ताहाला न जुमानता उपविभाग जिमलगट्टाअंतर्गत येणाऱ्या दामरंचा उप पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांनी ३ नग बंदूका व १ नग बंदुकीचे बॅरेल गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दामरंचा उप पोलिस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक पृथ्वीराज बाराते, पोलिस उपनिरीक्षक अनिकेत संकपाळ व अंमलदार यांनी राबविलेल्या प्रभावी नागरी कृती उपक्रमांमूळे दामरंचा हद्दीतील नागरीक माओवादाच्या प्रभावाला झुगारत मुख्य प्रवाहामध्ये सामिल होताना दिसून येत आहेत.
तसेच सन २०२२ मध्ये एकूण ७३, सन २०२३ मध्ये ४६ व मागील वर्षी २०२४ मध्ये एकूण २६ भरमार बंदूका जिल्ह्यातील नागरिकांनी गडचिरोली पोलिस दलासमक्ष स्वाधीन केलेल्या होत्या. मागील तीन वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात भरमार बंदूका जिल्ह्यातील नागरिकांनी पोलिस दलाच्या स्वाधीन केल्या आहेत, हे पाहता येथील नागरिकांच्या मनात गडचिरोली पोलीस दलाप्रति विश्वास दृढ होताना दिसून येत आहे. यासोबतच गडचिरोली पोलिस दलाच्या नागरीकृती उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यारातील नागरिक आता माओवादाच्या भयापासून मूक्त होताना दिसून येत आहे. याचेच उदाहरण म्हणजे उपविभाग कुरखेडाअंतर्गत येणारे कोरची येथील बाजारपेठ माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमूळे जवळपास मागील २० वर्षांपासून नक्षल सप्ताहादरम्यान बंद ठेवण्यात येत होती. मात्र अनेक वर्षानंतर यावर्षी कोरची येथील व्यापारी आणि नागरिकांनी माओवाद्यांची दहशत झुगारुन यावर्षी नक्षल सप्ताहादरम्यान देखील बाजारपेठ सुरळीतपणे चालू ठेवली आहे. नक्षल सप्ताहादरम्यान नागरिकांनी दाखविलेल्या विश्वास आणि साहसाबद्दल पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी नागरिकांचे अभिनंदन केले आहे. तसेच जनतेच्या संरक्षणासाठी गडचिरोली पोलिस दल नेहमीच सतर्क असल्याबाबत अधोरेखित केले आहे.










