आधारविश्व फाउंडेशनचा नववा वर्धापनदिन उत्साहात साजरावर्धापनदिन

134

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ८: आधारविश्व फाउंडेशनचा ९ वा वर्धापनदिन आधारविश्व फाऊंडेशनच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून फाउंडेशनच्या उपाध्यक्ष डॉ. वीणा जंबेवार, सचिव प्रा. सुनीता साळवे, प्रा. विजया मने होत्या. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांच्या स्वागतानंतर नेहमीप्रमाणे ‘हिच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आधारविश्व फाऊंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. २०१७ मध्ये गीता हिंगे यांच्या कल्पनेतून अगदी बोटावर मोजण्या इतक्या समवयस्क मैत्रिणी सोबत घेऊन आधारविश्व फाउंडेशनची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम खंड न पडता सातत्याने राबवले जातात. ही संस्था फक्त महिलांचीच असून त्यांच्या सतत नावीन्यपूर्ण व समाजोपयोगी उपक्रमामुळे आधारविश्व फाउंडेशनची जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे. कोरोना महामारीत तर या फाउंडेशनच्या सदस्यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. विशेष म्हणजे हे सर्व उपक्रम कुठलेही अनुदान न घेता स्वखर्चाने केले जाते. अध्यक्षीय भाषणाचे पुष्प गुंफतांना गीता हिंगे म्हणाल्या की, २०१७ मध्ये मी एक रोपटे लावले होते त्याचे वृक्षात रूपांतर झाले आणि आता वटवृक्षात रूपांतर होत आहे. हे सर्व माझ्या एकटीमुळे नाही तर तुमच्या सर्वांची साथ आणि सहकार्यामुळे शक्य झाले. हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून तुम्हा सर्वांचा आहे. म्हणून हा पुरस्कार मी आधारविश्व फाउंडेशनला समर्पित करते. या पुरस्कारामुळे माझ्या कामाची जबाबदारी अजून वाढली आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने शेवटच्या श्वासापर्यंत आधारविश्व फाऊंडेशनचे कार्य अविरत सुरू राहील, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमादरम्यान वंदना गीते, मिनल हेमके ,सुनीता आलेवार,फरझाना शेख, शिल्पा हेमके, अंजली देशमुख, सीमा कन्नमवार, संगीता नवघडे, संजीवनी मने आदी सदस्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. आधारविश्व फाऊंडेशनला जुळल्यामुळे आमचे जीवन कसे बदलले, जगण्याची उर्मी मिळाली हे सांगताना काही जणी भावनिक झाल्या तर काहींना अश्रू अनावर झाले. यावेळी उपाध्यक्ष वीणा जंबेवार, सचिव सुनीता साळवे यांनी फाउंडेशनच्या स्थापनेपासून मोलाचे योगदान दिल्याबद्दल तसेच विजया मने यांची प्राचार्य म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल व मिरा कोलते या परिसेविका म्हणून सेवानिवृत्त झाल्याबद्दल या सर्वांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विजया मने यांनी केले. संचालन मिरा कोलते, तर आभार प्रतिमा सोनवने यांनी मानले. यावेळी आधारविश्व फाउंडेशनच्या सदस्य लता संतोषवार, प्रिया निशाणे, आरती सरोदे, अर्चना कवासे, धनश्री तुकडदेव, प्रिती मेश्राम, उज्वला करपे, भूमिका बरडे, भारती खोब्रागडे, उज्ज्वला शिंदे, विजया चव्हाण, इंदू नारदेलवार, संजीवनी मने, वर्षा बच्चुवार, अलका कत्रोजवार, संगीता राऊत, मंजुषा आंबटवार, वर्षा शेडमाके, रसिका मारगाये तसेच आधारविश्व फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येन उपस्थित होते.

——————————————