स्वातंत्र्यदिनानिमित्त गडचिरोली पोलिस दलाच्या भव्य तिरंगा रॅली निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

68

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. १५ : देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलिस विभागाच्या वतीने आयोजित भव्य तिरंगा रॅलीने जिल्ह्यात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले.

पोलिस अधीक्षक कार्यालय कार्यालयात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलिस दलातील ७ पोलिस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक जाहीर झाले होते. या कार्यक्रमाप्रसंगी पदक विजेत्यांचा प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यासोबतच १४ ऑगस्ट २०२५ रोजी गडचिरोली पोलिस दलातील पदोन्नती मिळालेल्या पोलिस अंमलदारांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या व हुतात्मा कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर नवजीवन वसाहत येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा करत ध्वजारोहण करुन आत्मसमर्पित माओवाद्यांच्या कुटुंबामध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले. यानंतर गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री अॅड. आशीष जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रॅलीसाठी गडचिरोली पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण ३०० हून अधिक अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. पोलिस मुख्यालय ते इंदिरा गांधी चौकापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीचे आयोजन देशसेवा तसेच शौर्य आणि त्यागाचा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी खासदार डाॅ. अशोक नेते, आमदार डाॅ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव, सहायक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यासोबतत मागील वर्षी जून २०२४ मध्ये गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी डिकेएसझेडसीएम गिरीधर तुमरेटी याने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केले होते. आजच्या या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी गिरीधर तुमरेटी याने आत्मसमर्पणानंतर पहिल्यांदाच त्याच्या मूळ गावी जवेली खुर्द येथे भेट देत ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होऊन स्वातंत्र्यदिन साजरा करून संविधानाप्रती आदर व्यक्त केला. माओवादी अतिदुर्गम गावांमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी काळे झेंडे फडकविण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र गडचिरोली पोलिस दलाने त्यांचे मनसुबे उधळून लावत १५ ऑगस्ट रोजी दुर्गम-अतिदुर्गम भागांमध्ये व विविध पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला. विशेष बाब म्हणजे भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांनी पोलिस पथकासह अभियान राबवून नारगुंडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अतिदुर्गम मर्दहूर येथे ध्वजारोहण करत नागरिकांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा केला.  तसेच पोलिल स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र स्तरावर गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांची रॅली तसेच अंमली पदार्थ विरोधी शपथ याप्रकारच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली. तसेच अतिदुर्गम भागांमध्ये विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या सहभागाने राष्ट्रध्वजासोबत मिरवणूका काढण्यात आल्या. यासोबतच नव्याने उभारलेल्या नेलगुंडा व कवंडे पोलिस स्टेशन येथेदेखील पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यासोबतच गडचिरोली पोलिस मुख्यालयात अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी यांच्या हस्ते ध्वजारोहणचा कार्यक्रम पार पडला. तसेच गडचिरोली जिल्ह्रातील संपूर्ण पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्रात ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.