नगरपालिका हद्दीत वाहनांना वेगमर्यादा लागू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

216

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ८ : नागरी वस्तीतून जाणाऱ्या वाहनांनी नियमांनुसार वेगमर्यादेत रहावे, यासाठी नगर परीषद क्षेत्रात कमी वेगमर्यादा लागू करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या. जिल्ह्यातील विशेषत: २०१८ पूर्वीच्या जड वाहनांमध्ये बसविण्यात आलेल्या वेगमर्यादा चिप कार्यरत आहेत का, याची काटेकोर तपासणी करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

रस्ते सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पंडा यांनी अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणे अत्यावश्यक असल्याचे सांगून रुग्णवाहिका तातडीने पोहोचण्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात १०८ क्रमांकावर केवळ १० रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे निदर्शनास आल्यानंतर १०२ सेवेच्या आणखी ४० रुग्णवाहिकादेखील अपघातस्थळी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रणाली विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांची जाणीव विद्यार्थ्यांना लहान वयापासून व्हावी, यासाठी गडचिरोली येथे ट्राफीक पार्क उभारता येईल का, याची चाचपणी करून अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’, राँग साईड, हेल्मेट, सीटबेल्ट आदी मोहिमांअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईचाही आढावा यावेळी घेण्यात आला. रत्यांवरील खड्ड्यांबाबत जिल्ह्यातील सर्वाधिक तक्रारी राष्ट्रीय महामार्गांबाबत असल्याचे निदर्शनास आले असून याबाबत आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग व पोलिस विभाग यांनी समन्वयाने काम करून रस्ता सुरक्षा उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीस वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शरद मेश्राम, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

—————————-