मोडस्केच्या किर्रर्र रानातील चकमकीत दोन जहाल महिला माओवादी ठार

145

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १७ : एटापल्ली तालुक्यातील गट्टा (जां.) पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मोडस्के जंगल परीसरात झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिस व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी दोन जहाल महिला माओवाद्यांना कंठस्नान घातले. सुमित्रा ऊर्फ सुनिता वेलादी (वय ३८) रा. मडवेली ता. अहेरी, जि. गडचिरोली व ललीता ऊर्फ लड्डो ऊर्फ संध्या कोरसा (वय ३४) रा. नेलटोला, ता. पाखांजूर, जि. कांकेर (छत्तीसगड) अशी मृत महिला माओवाद्यांची नावे आहेत.

गट्टा दलमचे काही माओवादी एकत्र येऊन दबा धरून बसले आहेत, अशा गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून अपर पोलिस अधीक्षक, अहेरी सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिस दलातील विशेष अभियान पथकाच्या पाच तुकड्या बुधवार (ता. १७) अहेरी येथून तातडीने या जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबविण्यासाठी रवाना करण्यात आल्या होत्या. तसेच अभियानादरम्यान गट्टा (जां.) पोलिस स्टेशनचे पोलिस पथक व सीआरपीएफ १९१ बटालियन ई कंपनीच्या पथकाकडून जंगलाच्या बाहेरून जंगल परिसरात घेराबंदी करण्यात आली होती. यावेळी मोडस्के जंगल परिसरात पोलीस पथके माओवादविरोधी अभियान राबवत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यावेळी पोलिसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेऊन शरण येण्याबाबत आवाहन केले असता, माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.चकमकीनंतर या जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळावर २ जहाल महिला माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. दोन्ही मृतक महिला माओवाद्यांची ओळख पटली आहे. मृत महिला माओवाद्यांपैकी ललीता ऊर्फ लड्डो ऊर्फ संध्या कोरसा ही गट्टा दलम डिव्हीसीएम राजु वेलादी ऊर्फ कलमसाय याची पत्नी होती. या मृत माओवाद्यांवर चकमक, जाळपोळ व खुन आदी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यासोबतच घटनास्थळावरुन १ एके-४७ रायफल, १ अत्याधुनिक पिस्तूल असे एकूण २ अग्निशस्त्र, जिवंत काडतूस, माओवादी साहित्य व इतर दैनंदिन वापराचे साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे. तसेच मृत महिला माओवाद्यांपैकी ललीता ऊर्फ लड्डो ऊर्फ संध्या कोरसा ही गट्टा दलम डिव्हीसीएम राजू वेलादी ऊर्फ कलमसाय याची पत्नी होती. माओवादविरोधी अभियान अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल, कमांडंट १९१ बटालियन सीआरपीएफ सत्य प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक, अहेरी श्री. सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वात सी-६०, गट्टा (जां.) पोलिस स्टेशन आणि सीआरपीएफच्या जवानांनी पार पाडली. सन २०२१ पासून आजपर्यंत गडचिरोली पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ९३ कट्टर माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून, १३० माओवाद्यांना अटक करण्यात आले आहे व ७५ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या खडतर अभियानादरम्यान सी-६० व सीआरपीएफच्या जवानांनी दाखविलेल्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि सर्व जवानांना सुखरूप परत आणण्यासाठी संपूर्ण अभियानाची देखरेख करून अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गडचिरोली गोकुल राज जी., पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, सी-६० प्राणहिताचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक राहुल देवडे यांच्यासह सी-६० गडचिरोली आणि प्राणहिताचे इतर अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या भागात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून पून्हा एकदा सर्व माओवाद्यांना हत्यार ठेवून आत्मसमर्पण करून मुख्य धारेमध्ये प्रवेश करण्यासाठी आवाहन केले आहे.

सुमित्रा ऊर्फ सुनिता वेलादी ही गट्टा दलम कमांडर होती. तिच्यावर शासनाने ८ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. १४ चकमक, १२ खून, ३ जाळपोळ, २ इतर अशा एकूण ३१ गुन्ह्यांत तिचा सहभाग होता. ललीता ऊर्फ लड्डो ऊर्फ संध्या कोरसा ही गट्टा दलम एसीएम पदावर कार्यरत होती. तिच्यावर सरकारने ६ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. तिचा ८ चकमक,४ खून, १ जाळपोोळ, १ इतर अशा एकून १४ गुन्ह्यांत सहभाग होता. पोलिसांनी घटनास्थळावरून एक एके ४७ रायफल, १ पिस्तूल, ३७ जिवंत काडतूस आणि २ वॉकी टॉकी जप्त केले.

——————————