ग्रीन्सच्या जंगल जत्रेत विद्यार्थ्यांनी वाटला निसर्ग ज्ञानाचा खजिना वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजन; आमदार, उपवनसंरक्षकांनी साधला मनमोकळा संवाद

90

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ६ : निसर्ग संरक्षण व संवर्धन क्षेत्रात कार्यरत ग्रिन्स संस्थेच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त सोमवार (ता. ६) आयोजित ग्रिन्स जंगल जत्रा या अनोख्या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी विविध स्टाॅल्स व पथनाट्याच्या माध्यमातून निसर्ग ज्ञानाचा खजिना सर्वांना वाटला. या कार्यक्रमाला उपस्थित गडचिरोली विधासनभा क्षेत्राचे आमदार डाॅ. मिलिंद नरोटे, गडचिरोली वनविभागाच्या उपवनसंरक्षक आर्या व इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या विविध स्टाॅल्सना भेट देत मनमोकळा संवाद साधला.

स्थानिक पीएम श्री जवाहरलाल नेहरू नगर परीषद उच्च प्राथमिक शाळेत आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली वनविभागाच्या उपवनसंरक्षक आर्या होत्या. तसेच प्रमुख पाहुणे वनविभागाचे विभागीय वनअधिकारी गणेश पाटोळे, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक सतीश चिचघरे, प्राचार्य शमशेरखान पठाण, प्राचार्य शेमदेव चाफले, राजेश इटनकर, ग्रिन्स संस्थेच्या अध्यक्ष अंजली कुळमेथे, भाजपचे अनिल पोहनकर, ग्रिन्स संस्थेचे सचिव तथा गडचिरोली वनविभागाचे मानद वन्यजीव मिलिंद उमरे, सुभाष धंदरे, निलेश पटले, खुशाल ठाकरे आदींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार डाॅ. मिलिंद नरोटे म्हणाले की, राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला आपला गडचिरोली जिल्हा निसर्ग समृद्ध आहे. हा निसर्ग जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आजचे विद्यार्थी देशाचे भावी सुजाण नागरिक आहेत. त्यामुळे त्यांनी निसर्ग जाणावा, सांगावा आणि जपावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांवर निसर्ग संवर्धनाचे संस्कार करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करून प्रयत्नरत असलेल्या ग्रिन्स संस्थेचेही कौतुक केले. उपवनसंरक्षक आर्या म्हणाल्या की, निसर्ग जपणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. गडचिरोली जिल्ह्यात अनेक दुर्मळ प्रजातीचे प्राणी, पक्षी आहेत. त्यांच्या जतनासाठी आपण सारेच मिळून प्रयत्न करू. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्मिळ प्राणी, पक्ष्यांची चित्रे, रेखाटने तसेच पथनाट्याद्वारे माहिती देत जनजागृती केली. मान्यववरांनी सर्व स्टाॅल्सना भेटी देत विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. तसेच पथनाट्यही सादर करण्यात आले. उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या चमूंना प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिकाने गौरवण्यात आले.स्पर्देचे परीक्षण वनविभागाचे विभागीय वनअधिकारी गणेश पाटोळे, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक सतीश चिचघरे यांनी केले. प्रथम परितोषिकाची रक्कम तीन हजार रुपये आमदार डाॅ. मिलिंद नरोटे, द्वितीय पारितोषिकाची रक्कम दोन हजार रुपये प्राचार्य डाॅ. राजाभाऊ मुनघाटे व तृतीय पारितोषिकाची रक्कम १ हजार रुपये सतीश चिचघरे यांच्याकडून देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रिन्स संस्थेच्या अध्यक्ष अंजली कुळमेथे यांनी केले. संचालन पीएम श्री पंडित जवाहरलाल नेहरू नगर परीषद उच्च प्राथमिक शाळेचे प्राचार्य सुधीर गोहणे यांनी केले, तर आभार प्राचार्य शेमदेव चाफले यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रिन्सचे सर्व पदाधिकारी, सदस्य, राणी दुर्गावती कन्या विद्यालयाच्या प्राचार्य वैशाली मडावी, शिक्षिका संध्या येलेकर, भगवंतराव हिंदी शाळेचे शिक्षक सन्नी नंदनवार, पीएम श्री जवाहरलाला नेहरू उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

 

या विषयी दिली रंजक माहिती……

या कार्यक्रमात राणी दुर्गावती कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पथनाट्याच्या माध्यमातून नामशेष होत असलेल्या दुर्मिळ गिधाड पक्ष्यांवर पथनाट्य सादर करत जनजागृती केली. भगवंतराव हिंदी शाळेच्या वतीने वाघाचे महत्त्व विशद करण्यात आले. तसेच पीएम श्री जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वर्ग नर्तक पक्षी, गिधाड, शेकरू, वाघ आदी प्राणी, पक्ष्यांबद्दल सखोल व रंजक माहिती दिली. याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी खास पक्ष्यांची चित्रे लावून तयार केलेला सेल्फी पाॅइंटसुद्धा आकर्षणाचे केंद्र ठरला.

————————————