मुख्यमंत्री म्हणाले, ही माओवादाच्या हिंसापर्वाच्या समाप्तीची सुरुवात

77

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १५ : केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नातून मावोवादी केंद्रीय समितीच्या अनेक जहाल वरीष्ठांसह एकूण ६१ सदस्यांनी सशस्र आत्मसमर्पण केले. ही माओवादाच्या हिंसापर्वाच्या समाप्तीची सुरुवात असून माओवाद १०० टक्के हद्दपार होणार आहे, अशी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार (ता १५) दिली. या लढाईचे नेतृत्व गडचिरोली जिल्हा करत आहे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे साडेपाच कोटींहून अधिक बक्षीस असलेला माओवादी चळवळीतील सर्वोच्च नेता भूपती उर्फ मल्लोजुल्ला वेणूगोपालराव याच्यासह माओवादी केंद्रीय समितीच्या दोन डिकेएसझेडसी सदस्य, १० डिव्हीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह एकूण ६१ जहाल माओवादी सदस्यांनी सशस्र शरणागती पत्करली. त्यांनी ५४ शस्त्रांसह व माओवादी गणवेशात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केले. या सर्व माओवाद्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संविधानाची प्रत देऊन लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, अपर पोलिस महासंचालक विशेष कृती डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखिव पोलिस दलाचे उप महानिरीक्षक (परिचालन) अजय शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ४० वर्षांपूर्वी अहेरी, सिरोंचा या भागात नवीन दलम सुरू करून मावोवाद चळवळ उभी करणाऱ्या भूपतीसारख्या वरिष्ठ माओवादी नेत्याने आज ६१ साथीदारांसह सशस्र आत्मसमर्पण केले आहे. ही देशाच्या इतिहासातील अत्यंत मोठी घटना आहे. आजच्या आत्मसमर्पणातून नवीन इतिहास लिहिला गेला आहे. यापूर्वी उत्तर गडचिरोलीतून माओवाद संपुष्टात आणण्यात आला आहे आणि आजच्या या आत्मसमर्पणामुळे दक्षिण गडचिरोलीतील माओवादही संपुष्टात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जे काही ८ ते १० माओवादी शिल्लक आहेत, त्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात यावे अन्यथा त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक येत असून, हा जिल्हा ‘स्टील हब’ बनत आहे. गुंतवणूक करणाऱ्यांना ९० टक्के स्थानिकांना रोजगार देण्याच्या अटीवरच परवानगी दिली जात असून १ लाख स्थानिकांना रोजगार देण्याचा मानस आहे, असे त्यांनी सांगितले. गडचिरोलीत इन्फ्रास्ट्रक्चर उभारताना जल, जमीन, जंगल यांचा नाश होऊ नये यासाठी ५ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. पुढील काळात गडचिरोलीला देशाचा ग्रीन स्टील हब करण्यासाठी योजना आखल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली की, २०२१ पासून आतापर्यंत १४० माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे, ८१ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, तर ९३ जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यावेळी नक्षल पीडित कुटुंबांना धनादेशांचे वितरणही करण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला संबंधित अधिकारी व मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.

————————————