ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २४ : जिल्ह्यातील वांगेतुरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामस्थांनी त्यांच्याकडील भरमार बंदुकांसह बॅरल पोलिसांच्या स्वाधिन केले.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगलक्षेत्र असल्यामुळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपरिक शेती व्यवसायासोबतच शिकार करून उदरनिर्वाह करत असत. शिकार करण्यासाठी तसेच वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत असत. अशाच प्रकारच्या वडीलोपार्जित बंदुका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत. दुर्गम-अतिदुर्गम भागात माओवादी याच बाबीचा फायदा घेऊन, सर्वसामान्य जनतेला माओवादी चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. सध्याचे परिस्थितीत जेव्हा मागील पाच वर्षांत गडचिरोली जिल्ह्यातील एकही तरूण माओवादी चळवळीत भरती झालेला नाही. तसेच गडचिरोली जिल्ह्यात मोजकेच सशत्र माओवादी शिल्लक असताना, या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी नागरिकांना स्वत:जवळ बाळगलेल्या बंदुका स्वच्छेने जवळच्या पोलिस स्टेशन येथे स्वाधीन कराव्या असे आवाहन केले होते. गडचिरोली पोलिस दलाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत वांगेतुरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हिंदुर, नैनवाडी, तोडगट्टा या दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांनी त्यांच्याकडे बाळगलेल्या २६ भरमार बंदुका व ११ नग बंदुकीचे बॅरल वांगेतुरी पोलिस स्टेशन येथे स्वाधीन केले आहेत. हेडरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी योगेश रांजणकर यांच्या नेतृत्वात वांगेतुरी पोलिस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खडतरे, पोलिस उपनिरीक्षक सादुलवार, पोलिस उपनिरीक्षक काळे, अंमलदार तसेच सीआरपीएफचे अधिकारी व अंमलदारांनी राबवलेल्या प्रभावी नागरीकृती उपक्रमांमूळे वांगेतुरी हद्दीतील नागरीक माओवादाच्या प्रभावाला झुगारत मुख्य प्रवाहामध्ये सामिल होताना दिसून येत आहेत.सन २०२२२ मध्ये एकूण ७३, सन २०२३ मध्ये ४६ व सन २०२४ मध्ये एकूण २६ तसेच सन २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण २९ भरमार बंदूका व १२ बंदुकीचे बॅरल जिल्ह्यातील नागरिकांनी गडचिरोली पोलिस दलासमक्ष स्वाधीन केले आहेत. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी आतापर्यंत एकूण ३६५ भरमार बंदुका पोलिस दलासमक्ष स्वाधीन केल्या आहेत. मागील तीन वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात भरमार बंदूका जिल्ह्यातील नागरिकांनी पोलिस दलाच्या स्वाधीन केल्या आहेत.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक अहेरी (प्राणहिता)सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., हेडरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी योगेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वांगेतुरी पोलिस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खडतरे, पोलिस उपनिरीक्षक सादुलवार, पोलिस उपनिरीक्षक काळे व अंमलदारांनी पार पाडली.
———————————










