बाईकचे डिझाईन बदलून, जॅकेटमध्ये खिसे तयार करून दारूतस्करी करणारे अटकेत

127

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २४ : दुचाकी वाहनाची संरचना बदलून आणि कपड्यांमध्ये छुप्या पद्धतीने दारूची अवैध वाहतूक करून तस्करी करणाऱ्या आरोपींवर कारवाई करत

गडचिरोली पोलिसांनी केला एकूण ९६ हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त केला.

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारुविक्री व वाहतुक करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याविरुद्ध पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अवैध दारूविक्री करणा­ऱ्यांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यावरुन रविवार (ता. २३) गडचिरोली पोलिस स्टेशनच्या पथकाने पारडी नाका येथे अवैद्य दारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीविरुद्ध कारवाई केली आहे. नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने सुरू आचार संहिता कालावधीत गडचिरोली पोलिस स्टेशन हद्दीमध्ये सहा नाक्यांवर स्थिर सर्वेक्षण पथक तैनात करण्यात आले आहे. रविवारी पारडी नाका येथे पोलिस अधिकारी व अंमलदार तैनाती दरम्यान वाहनांची पाहणी करत असताना गडचिरोलीकडे येत असलेल्या एका संशयीत दुचाकी वाहन चालकास थांबवून त्याची तपासणी केली. दुचाकी वाहन चालक तानाजी नानाजी पेंदोरकर ( वय ३४) रा. कुमार बस्ती, बीजेपी ऑफीसजवळ, बालानगर कुकरपल्ली, हैद्राबाद, तेलंगणा, हल्ली मु. व्याहाड (बु.) ता. सावली, जि. चंद्रपूर हा आपल्या निळ्या रंगाच्या पल्सर दुचाकी वाहन क्र. एम एच ३४ ए एक्स ९८०९ च्या पेट्रोल टाकीमध्ये छुप्या पद्धतीने अवैधरित्या दारूची वाहतूक करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर दोन पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता, दुचाकी वाहनाच्या पेट्रोल टाकीमध्ये दारूच्या ४० नग सिलबंद बॉटल एकूण किंमत १६ हजार रुपये, दुचाकी वाहन अंदाजे किंमत ७० हजार रुपये असा एकूण ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. तसेच चंद्रपूरहून गडचिरोलीकडे येत असलेल्या एस टी बसमधील प्रवाशांची तपासणी केली असता एक वयस्कर महिला गुलाबी रंगाचा स्टोल अंगावर पांघरून घेऊन संशयीतरित्या बसलेली दिसली. महिलेची तपासणी केली असता ललीता सुधाकर महामंढरे (वय ६५)षे रा. रामपुरी, ता. आरमोरी जि. गडचिरोली, हल्ली मु. रामनगर वाॅर्ड क्र. १९ ता. जि. गडचिरोली ही आपल्या अंगात घातलेल्या जॅकेटमध्ये अवैधरित्या देशी दारु बाळगुन वाहतूक करत असल्याचे दिसून आले. तिच्या जॅकेटमध्ये ९० एम. एल. मापाच्या ९० नग देशी दारूच्या बाटल्या एकूण किंमत ९ हजार रुपये, एक मोबाईल १ हजार रुपये, असा एकूण १० हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यांचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी देशमुख व महिला पोलिस उपनिरीक्षक पूजा नैताम करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली.

—————————————