ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १९ : जिल्ह्यातील माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील तुमरकोठी या अतिदुर्गम गावात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उभारलेल्या नव्या पोलिस स्टेशनचे उद्घाटन शुक्रवार (ता. १९) पार पडले.
१००० सी–६० कमांडो, २१ बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलिस जवान, ५०० विशेष पोलिस अधिकारी व खासगी कंत्राटदाराच्या मदतीने उभारलेल्या नवीन पोलिस स्टेशनच्या उद्घाटन सोहळ्याला अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजयकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, १९१ बटालियनचे कमांडंट सत्य प्रकाशन उपस्थित होते.सन २०२४ वर्षाअखेर ११ डिसेंबर २०२४ रोजी पेनगुंडा येथे नवीन पोलिस मदत केंद्र, ३० जानेवारी २०२५ रोजी नेलगुंडा येथे नवीन पोलिस स्टेशन, ९ मार्च २०२५ रोजी याच भागात कवंडे येथे नवीन पोलिस स्टेशन व २३ नोव्हेंबर २०२५ रोजी फुलनार कॅम्प गुंडूरवाही येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तुमरकोठी येथील पोलिस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण १०५० मनुष्यबळ, ४ जेसीबी, ७ ट्रेलर, २ पोकलेन, २५ ट्रक आदीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसात पोलिस स्टेशनची उभारणी करण्यात आली. या पोलिस स्टेशनच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलिस दलाचे २ अधिकारी व ५२ अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप १२, हिंगोली ई कंपनीचे २ प्लाटुन तसेच सीआरपीएफ १९१ बटालियनच्या एफ कंपनीचे १ असिस्टंट कमांडंट व ७९ अधिकारी/अंमलदार, विशेष अभियान पथकाचे ८ पथक (२००0 कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोलिस स्टेशनच्या उभारणी कार्यक्रमादरम्यान जनजागरण मेळावा आयोजित करून महिलांना साड्या, चप्पल, पुरुषांना घमेले, ब्लॅकेट, स्वयंपाक भांड्यांचा संच, मच्छरदानी, युवकांना लोअर पॅन्ट, टी-शर्ट, नोटबुक, पेन, स्कूल बॅग, कंपास, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, क्रिकेट स्टंप संच, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल आदी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच वाढलेल्या सुरक्षेमुळे भविष्य काळात या अतिदुर्गम भागात नवीन रस्ते बांधकाम तसेच एस. टी. बस सेवा सुरू करणे शक्य होणार असून अतिदुर्गम भागात नवीन पोलिस स्टेशनच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी पोलिस व प्रशासनाचे आभार मानले.
—————————————-










