गडचिरोलीत दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा आणि समाजात संवेदनशीलतेचा संदेश देणारा ३६ वा अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह येत्या ८ ते १२ जानेवारी दरम्यान

79

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता . ५ राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र आणि मैत्री परिवार संस्था, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने हा शैक्षणिक सप्ताह अभिनव लॉन, विद्या भारती शाळेजवळ, गडचिरोली येथे पार पडणार आहे. या उपक्रमात महाराष्ट्रातील तब्बल १५ अंध विद्यालयांमधील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, काव्यवाचन, गायन, ब्रेल वाचन, नृत्य, निबंध लेखन, मनाचे श्लोक तसेच प्रश्नमंजुषा अशा विविध शालेय, बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व विद्यार्थ्यांचा प्रवास, निवास, भोजन आणि बक्षिसांची संपूर्ण जबाबदारी गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक संस्था, दानदाते व सामाजिक बांधवांच्या सहकार्याने उचलण्यात येणार आहे. यासाठी आयोजकांनी समाजातील सर्व घटकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.८ जानेवारी रोजी सकाळी अंध विद्यार्थ्यांची प्रभात फेरी शहरातून काढण्यात येणार असून, या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तर गडचिरोलीकरांच्या मनोरंजनासाठी १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता रोशनी म्युझिकल ग्रुप, नागपूर यांचा भव्य ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, “अशी रंगली रात्र” या कार्यक्रमाद्वारे सांस्कृतिक संध्या रंगणार आहे.

या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत भोजराज पाटील उपाध्यक्ष, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र, सुहास खरे अध्यक्ष, माऊली मित्र मंडळ नागपूर, निरंजन वासेकर अध्यक्ष, मैत्री परिवार गडचिरोली, अविनाश चडगुलवार सचिव, अश्विनी भांडेकर महिला प्रमुख, प्रकाश मुद्दमवार आणि प्रमोद धात्रक सभासद, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र उपस्थित होते.

सर्व दानशूर व्यक्ती व संस्थांनी या उदात्त उपक्रमासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

दृष्टी नसली तरी जिद्द आणि प्रतिभेच्या बळावर यश मिळवता येते, हा संदेश देणारा हा अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह गडचिरोलीत प्रेरणादायी ठरणार आहे.