गोंडवाना विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात

71

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २१ : गोंडवाना विद्यापीठाचा १३वा दीक्षांत समारंभ बुधवार (ता. २१) विद्यापीठाच्या नवीन सांस्कृतिक सभागृहात पार पडला.

 

प्रमुख प्राहुणे म्हणून पद्मश्री डॉ. अभय बंग उपस्थित होते. या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे होते. तसेच गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नागपूरचे सहसंचालक डॉ. मनोज डायगव्हाणे, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम खंडारे, आंतरविद्याशाखीय विद्याशाखेच्या डॉ, प्रगती नरखेडकर, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे डॉ. जयेश चक्रवर्ती, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे डॉ.अशोक मिस्त्री, वित्त व लेखाधिकारी सी. ए. भास्कर पठारे, व्यवस्थापन परिषद सदस्य राज्यपाल नामीत प्रशांत मोहिते, स्वप्नील दोंतुलवार, विवेक गोर्लावार, डॉ. लेमराज लडके, डॉ. संजय गोरे, प्रशांत दोंतुलवार, डॉ. रंजना लाड, उच्चशिक्षण नागपूर सहसंचालक संतोष चव्हाण, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रवीण पोटदुखे आदी उपस्थित होते. समारंभात मार्गदर्शन करताना डाॅ. बंग म्हणाले की, गोंडवाना विद्यापीठ म्हणजे गडचिरोलीसारख्या वनाने बहरलेल्या भागामध्ये नवे तपोवन आहे. या नव तपोवनामधून होणारे सामाजिक अनुबंध जोडणारे उपक्रम निश्चितच समाजाला आकार देत आहेत. गोंडवाना विद्यापीठ केवळ पुस्तकी ज्ञानावर भर देत नसून समाज मन तयार करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलत आहे, असेही ते म्हणाले. अध्यक्षस्थानाहून बोलताना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले की, विद्यापीठाचे एकल प्रकल्प, विद्यापीठ आपल्या गावात, स्पार्क, गोसेखुर्द प्रकल्प, विरबाबूराव शेडमाके योजना, स्कुल कनेक्ट, विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था, हे सगळे प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहेत. यात विद्यापीठाच्या शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. आमच्या अडपल्ली येथील १७० एकर जागेवर विद्यापीठाच्या देखण्या परिसराचे बांधकाम लवकरच सुरू होईल आणि हे विद्यापीठ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात वेगळे असे विद्यार्थ्यांप्रती आणि समाजाप्रती स्वतःचे उत्तरदायित्व सिद्ध करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या समारंभात विशेष गुणवत्ता प्राप्त, प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थिनींना सुवर्ण पदक, आचार्य पदवी व पदवी, पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. संचालन भौतिकशास्त्र विभाग प्रमुख सहायक प्रा. अपर्णा भाके आणि मराठी विभाग प्रमुख सहायक प्रा. सविता गोविंदवार तर आभार गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले. या समारंभामध्ये, अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषदेचे सदस्य,दानदाते णि विद्यापीठातील विविध प्राधिकरणाचे, मंडळाचे, समित्यांचे सदस्य, संलग्नीत महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.या सोहळ्यात ९६ जणांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. तसेत ४३ पदकांचे वितरण करण्यात आले. ३९ विद्यार्थ्यांना सुवर्ण , एक रजत , एक इंद्रधनुष्य , एक अश्वमेध , एक आचार्य पदवी इतिहास अशी एकूण ४३ पदके प्रदान करण्यात आली . तसेच स्पार्क (SPARC)अभ्यासक्रमाच्या (Social Programme on Addiction in Rural Community ) विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली.

 

या दीक्षान्त सोहळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील दोन विद्यार्थिनींनी प्रत्येकी तीन सुवर्ण पदके पटकावली. वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतून तीन सुवर्णपदके चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीतील नेवाजाबाई हितकारिणी महाविद्यालयाची वैष्णवी संजय थेरकर, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतून याच जिल्ह्यातील नागभीड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी आर्ट अँड विज्ञान कॉलेजची जादा रबिया रियाज हिनेसुद्धा तीन सुवर्णपदके पटकावली. दोघांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

——————————————–