आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मैदानी खेळ आवश्यक – आमदार डॉ. मिलिंद नरोटे

113

गडचिरोलीत अप्पर-डिप्पर क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात चार संघांमध्ये रंगणार चुरशीच्या लढती

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २४ :आजच्या धकाधकीच्या व बदलत्या जीवनशैलीत आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम व मैदानी खेळ अत्यावश्यक झाले आहेत. क्रिकेटसारखे मैदानी खेळ शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्यासाठीही महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले. अप्पर-डिप्पर ग्रुपच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शनिवारी (ता. २४) शहरातील शिवाजी महाविद्यालयालगत असलेल्या स्व. गंगुवार मैदानावर या क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोलीच्या नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषदेचे उपाध्यक्ष निखिल चरडे, अबूझमाड शिक्षण मंडळाचे सचिव समशेर खान पठाण, पोलीस दक्षता पथकाचे डीवायएसपी सुनील महाडीक, प्रेस क्लबचे अध्यक्ष मिलिंद उमरे, सामाजिक कार्यकर्ते बलराम सोमनानी, सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. यशवंत दुर्गे, आयफार्मचे संचालक राजेश इटनकर, नगरसेवक सागर निंबोरकर, रवि मेश्राम, प्रमोद पिपरे, निखिल मंडलवार, भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, माजी नगरसेवक अविनाश वरगंटीवार आदी मान्यवर उपस्थित होते.

अप्पर-डिप्पर ग्रुपच्या वतीने दरवर्षी ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येते. यापूर्वी पर्यावरणाशी संबंधित नावांनी संघांची ओळख होती. मात्र यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांवरून संघांची नावे ठेवण्यात आली आहेत.

यामध्ये —

सिंहगड लायन्स (मालक : निखिल मंडलवार),

प्रतापगड पँथर्स (मालक : अनुराग पिपरे),

शिवनेरी वॉरियर्स (मालक : बलराम सोमनानी)

आणि रामगड रॉयल्स (मालक : डॉ. यशवंत दुर्गे) या चार संघांचा समावेश आहे.

स्पर्धेच्या उद्घाटनानंतर चारही संघांचे मालक, कर्णधार व खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. ही स्पर्धा १ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार असून विजेत्या संघाला आकर्षक चषकासह रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अप्पर-डिप्पर ग्रुपच्या सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रुपचे अध्यक्ष रूपराज वाकोडे यांनी केली. सूत्रसंचालन शिक्षक रमन गागापुरवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार नितेश खडसे यांनी मानले.