सर्व सुजाण नागरिकांनी उपस्थित राहावे – नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली,तारिक.२५ : भारतीय संविधानाच्या गौरवाचा आणि लोकशाही मूल्यांचा उत्सव असलेला ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी गडचिरोली शहरात अत्यंत उत्साहात व राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने नगर परिषद गडचिरोली येथे सकाळी ठीक ७.४५ वाजता भव्य ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा ध्वजारोहण कार्यक्रम नगराध्यक्ष मा. प्रणोती निबोंरकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता ही मूल्ये जनमानसात अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिन हा केवळ राष्ट्रीय सण नसून, तो देशाच्या एकतेचे, लोकशाहीच्या बळकटीचे व संविधानप्रती निष्ठेचे प्रतीक आहे.
हा सोहळा अधिक अर्थपूर्ण व्हावा, यासाठी शहरातील सर्व घटकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नगराध्यक्ष मा. प्रणोती निबोंरकर यांनी नमूद केले आहे.
तरी या ध्वजारोहण कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, नगर परिषद कर्मचारी व अधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, विविध समित्यांचे सभापती, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते तसेच गडचिरोली शहरातील सर्व सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगर परिषद गडचिरोली यांच्यावतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव करून देणारा हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा गडचिरोली शहरासाठी अभिमानास्पद ठरणार असून, सर्व शहरवासीयांनी उपस्थित राहून या राष्ट्रीय पर्वाची शोभा वाढवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
जय हिंद! जय भारत! 🇮🇳










