केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सर्व समाजघटकांना न्याय देणारा आहे : आमदार प्रवीण दटके

64

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ४ : केंद्र सरकारने १ फेब्रुवारी रोजी सादर केलेला अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा आणि सर्वांच्याच हिताचा आहे, अशी माहिती नागपुरचे आमदार प्रवीण दटके यांनी बुधवार (ता. ४) पत्रकार परीषदेत दिली.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ संदर्भात पत्रकार परिषद सर्किट हाऊस शासकीय विश्रामगृहात पार पडली. या पत्रकार परिषदेला माजी खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर, भाजप समन्वयक प्रमोद पिपरे, नगर परीषद उपाध्यक्ष निखिल चरडे, गटनेते तथा सभापती अनिल कुनघाकर, महिला व बालकल्याण सभापती सीमा कन्नमवार, शिक्षण सभापती हर्षल गेडाम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका योगीता पिपरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पत्राकार परीषदेत आमदार प्रवीण दटके म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग दाखवणारा असून शेतकरी, युवक, महिला, आदिवासी समाज, लघु उद्योजक तसेच मध्यमवर्गीय घटकांसाठी आशादायी आहे. पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, रोजगारनिर्मिती व ग्रामीण विकासासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी जिल्ह्यातील रेल्वे विस्तार संबंधित माहिती देत, अर्थसंकल्पातील आदिवासी, वनवासी व दुर्गम भागांच्या विकासासाठी करण्यात आलेल्या तरतुदींचे स्वागत केले. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांच्या विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प असून केंद्र सरकारचा “सबका साथ, सबका विकास” हा संकल्प यामध्ये ठळकपणे दिसून येतो, असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत उपस्थित मान्यवरांनी अर्थसंकल्पाच्या विविध बाबींचे सविस्तर विश्लेषण करून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. अखेरीस भाजप जिल्हा वतीने केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले. या पत्रकार परीषदेदरम्यान भाजपच्या वतीने आमदार प्रवीण दटके व नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

——————————————–