महाशिवरात्रीला विदर्भाच्या काशीत भव्य यात्रा, बायपासअभावी वाहतूक कोंडी, स्थानिकांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची मागणी

113

ग्लोबल गडचिरोली न्यूज

चामोर्शी, ता. ०४ :विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील भगवान मार्कंडेश्वर महादेव मंदिर समूहात येत्या १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने दाखल होत असल्याने मार्कंडादेव परिसरात दरवर्षी प्रचंड गर्दी उसळते.

वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले मार्कंडादेव हे प्राचीन व ऐतिहासिक धार्मिक स्थळ असून श्रद्धा, आस्था आणि अध्यात्माचे प्रमुख केंद्र मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेपासूनच भगवान मार्कंडेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. यावेळी विशेष पूजा, अभिषेक, रुद्राभिषेक तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

दरम्यान, मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सन २०१५ पासून प्रगतिपथावर असून राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुविधा वाढवण्याचे प्रयत्न होत असले तरी अजूनही काही मूलभूत अडचणी कायम असल्याकडे स्थानिक नागरिकांनी लक्ष वेधले आहे.

विशेष म्हणजे, यात्रेच्या कालावधीत बायपास मार्गाची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्यामुळे चामोर्शी–मार्कंडादेव मुख्य मार्गावर तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होते. याचा थेट फटका स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, दैनंदिन प्रवासी तसेच रुग्णवाहिकांना बसतो. अनेक वेळा तासन्‌तास वाहतूक ठप्प राहत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच, बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या प्रचंड गर्दीत स्थानिक भक्तांना दर्शनासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांना अनेक तास दर्शन रांगेत थांबावे लागत असल्याने यात्रेच्या कालावधीत स्थानिक भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ, भाविक तसेच विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

याशिवाय, बायपास मार्गाची तातडीने अंमलबजावणी, वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे तसेच आरोग्य सुविधांची योग्य सोय करण्यात यावी, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, यासंदर्भात जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, “मार्च महिन्यात योग्य नियोजन करून बायपास मार्गासंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल.”

महाशिवरात्रीसारख्या पवित्र सणाच्या निमित्ताने भाविकांची श्रद्धा जपत असतानाच स्थानिक नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जय संतोषी मॉं शक्तीपिठ संस्थानचे मठाधिपती आचार्यश्री श्रीमंत संतोष सुरपाम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.