गडचिरोलीत चालक पोलिस शिपाई २७, तर पोलिस शिपाईच्या ७१७ जागांसाठी पदभरती

188

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. १० : जिल्ह्यातील गडचिरोली पोलिस दलामार्फत चालक पोलिस शिपाई पदाच्या २७, तर पोलिस शिपाई पदाच्या ७१७ अशा एकूण ७४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या दोन्ही भरतीकरिता मैदानी (शारिरीक) चाचणीची तारीख जाहीर झाली असून ती दिनांक ११ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत गडचिरोली पोलिस मुख्यालयातील पटांगणावर आयोजित करण्यात आली आहे.

२७ चालक पोलिस शिपाई पदाकरिता ३२९६ उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले असून त्यापैकी २७९७ पुरुष उमेदवार व ४९९ महिला उमेदवारांचे अर्ज आहेत. तसेच पोलिस शिपाईच्या ७१७ पदाकरिता एकूण २३, ७९१ उमेदवारांनी अर्ज सादर केले असून त्यापैकी १६, ३१० पुरुष उमेदवार व ७, ४८१ महिला उमेदवार आहेत. या भरती प्रक्रीयेदरम्यान ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पहिल्या दिवशी १३०० उमेदवारांची व त्यानंतर दरदिवशी सरासरी १५०० उमेदवारांची शारीरिक (मैदानी) चाचणी घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना पोलिस शिपाई व चालक पोलिस शिपाई पदाच्या मैदानी (शारिरीक) चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व उमेदवारांनी आपले मैदानी (शारिरीक) चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र https://policerecruitment2024.mahait.org या वेबसाईटवरून डाऊनलोड करुन घ्यावे तसेच प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या मैदानी (शारिरीक) चाचणी परिक्षेची तारीख लक्षात घेऊन मैदानी (शारिरीक) चाचणीकरिता आवश्यक कागदपत्रांसह पोलिस मुख्यालय गडचिरोली येथे हजर राहण्याबाबत गडचिरोली पोलिस दलामार्फत कळविण्यात आले आहे. या भरतीसाठी प्रत्येक उमेदवाराकडे गडचिरोली जिल्ह्याचे वैध रहिवासी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. प्रत्येक उमेदवाराची सर्व प्रमाणपत्रे/कागदपत्रे ७ डिसेंबर २०२५ पूर्वीची असणे बंधनकारक आहे. या भरती प्रक्रीयेदरम्यान बंदोबस्तासाठी एकूण ६९ अधिकारी, ४८२ पोलिस अंमलदार असे एकूण ५५१ मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. ही पदभरती प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवारांची छाती-उंची या शारीरिक मोजणीकरिता पीएसटी (PST) Digital Physical Standard Test तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांची १६००० मी. धावणे (पुरुष), ८०० मी. धावणे (महिला), १०० मी. धावणे (पुरुष व महिला) च्या चाचणीकरिता (RFID) Based Technology चा वापर करण्यात येणार आहे. यासोबतच गोळा फेक चाचणीकरीता Prism Technology आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. मैदानी (शारिरीक) चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची बायोमॅट्रीक पद्धतीने हजेरी घेऊन पडताळणी करण्यात येणार आहे. जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही, तर त्यांना पुढची तारीख दिली जाईल. सोबतच काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणीकरिता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली, अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल. उमेदवारांना इतर काही अडचणी आल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर करण्यात येईल. पदभरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा वापर करू नये, असे करताना आढळून आल्यास उमेदवाराची उमेदवारी तत्काळ रद्द करून त्याच्यावर प्रचलित कायद्यान्वये योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये तसेच कोणीही आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलिस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष, दूरध्वनी क्र. ८८०६३१२१०० यावर तसेच उपविभागीय कार्यालय, पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्रात येथे माहिती द्यावी, असेही कळवण्यात आले आहे.

 

—————————-