जागतिक महिला दिनानिमित्त वडसा येथे भव्य विधी सेवा प्राधिकरण शिबिर; जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा

101

 

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली, ता , १० : येत्या ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडसा येथे विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने भव्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात शासनाच्या विविध योजना व सेवा, बचत गटांचे उपक्रम, महिला व बालकल्याण विषयक माहिती, तसेच ‘उमेद’ अंतर्गत अधिकाधिक स्टॉल उभारण्यावर भर देण्यात येणार असून महिलाभिमुख उपक्रमांना विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.

विधी सेवा प्राधिकरण शिबिराच्या प्रभावी आयोजनासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे व्यवस्थापक वसिम खान, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, वडसा उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शिबिराचे आयोजन वडसा येथील क्रीडा संकुलात करण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रीडा संकुलातील प्रशस्त जागेमुळे अधिकाधिक स्टॉल उभारणे शक्य होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक स्टॉलसाठी जागेची निवड व मोजमाप निश्चित करून नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच स्टॉल परिसरात वीज, पाणी, इंटरनेट यांसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

शासकीय व सहकारी बँकांकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांसाठी स्वतंत्र स्टॉल उभारण्याबरोबरच आधार कार्ड नोंदणी व केवायसी अद्ययावत करण्यासाठी स्वतंत्र स्टॉल व इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले.

शिबिरादरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित राहणार असल्याने शासकीय विश्रामगृहाची व्यवस्था नीटनेटकी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच कार्यक्रमपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करावे, सर्व संबंधित विभागांना आवश्यक पत्रव्यवहार वेळेत करावा, कार्यक्रमस्थळी ॲम्बुलन्स, अग्निशमन वाहन, पिण्याचे पाणी, मोबाईल शौचालये उपलब्ध ठेवावीत, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते दुरुस्ती व स्वच्छता करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

बैठकीला संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते