ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली : ता. २८ — चामोर्शी येथील काही महिला व पुरुषांनी त्यांच्यासोबत झालेल्या कथित फसवणुकीविरोधात कारवाईच्या मागणीसाठी २३ फेब्रुवारी २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला माजी आमदार तथा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी भेट देत ठाम पाठिंबा दर्शविला.
उपोषणकर्त्यांनी स्थानिक प्रशासन व संबंधितांवर गंभीर आरोप करत न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. डॉ. होळी यांनी उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली व त्यांच्या प्रमुख मागण्यांचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “कोणत्याही दबावाला बळी न पडता न्यायासाठी संघर्ष करू. मागण्या रास्त असतील तर त्या मान्य झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा दिला. आंदोलन संविधानिक चौकटीत व कायदेशीर मार्गाने पुढे नेले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रमुख मागण्या
अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली गरीब शेतकरी व शेतमजूर महिलांना बँकांशी संलग्न करून त्यांच्या नावावर कर्ज काढून फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या नगरसेवक आशिष अरुण पिपरे व नगरसेविका सोनाली आशिष पिपरे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी.
शिवम इंडस्ट्रीज व आर. एन. ट्रेडिंग कंपनीची विशेष तपास पथक (SIT) मार्फत सखोल चौकशी करावी.
संबंधित व्यक्तींनी जमा केलेल्या मालमत्तेची चौकशी करावी.
ट्रॅक्टर खरेदी-विक्री प्रकरणातील कथित फसवणुकीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
चिचडोह बॅरेज पाण्याखाली गेलेल्या जमीन रजिस्ट्री प्रकरणातील संबंधित महिलेला न्याय द्यावा.
दरम्यान, डॉ. होळी यांनी निलोत्पल (पोलीस अधीक्षक, गडचिरोली) यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यानंतर गडचिरोली व चामोर्शी पोलीस ठाण्यांचे निरीक्षक उपोषणस्थळी दाखल झाले. दोन्ही बाजूंमध्ये मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली.
डॉ. होळी यांच्या भेटीमुळे उपोषणकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पुढील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.










