महिलांच्या उपोषण व स्थानिक माध्यमांच्या पाठपुराव्यानंतर कार्यवाहीची सुरुवात; पिपरे दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद

243

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. १ : चामोर्शी येथील भाजपचे नगरसेवक आशिष पिपरे, त्यांच्या पत्नी नगरसेविका सोनाली पिपरे तसेच वडील अरुण पिपरे यांच्याविरुद्ध सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून २७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या उपोषणानंतर आणि स्थानिक माध्यमांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ही कारवाई झाल्याची चर्चा असून, त्यामुळे पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याची भावना व्यक्त होत आहे. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ट्रॅक्टर विक्रीचा बनाव करून फसवणुकीचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना रवींद्र कोठारे (३७, रा. चामोर्शी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. तक्रारीनुसार, २०२१ च्या नगरपंचायत निवडणुकीदरम्यान आशिष पिपरे यांनी कोठारे कुटुंबाकडून ३ लाख रुपये उसने घेतले होते. परतफेडीची मागणी केल्यानंतर स्वतःचा ट्रॅक्टर (एमएच ३३ व्ही ८०७५) ७ लाख ५० हजार रुपयांत विकण्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यापैकी ३ लाख रुपये समायोजित करून उर्वरित ४ लाख ५० हजार रुपये रोख व आरटीजीएसद्वारे देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मात्र, पैसे स्वीकारूनही ट्रॅक्टरची मूळ कागदपत्रे देण्यात आली नाहीत. २० मार्च २०२३ रोजी फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी कोठारे यांच्या घरी पोहोचले असता संबंधित ट्रॅक्टरवर ४ लाख ८० हजार रुपयांचे कर्ज थकीत असल्याचे उघड झाले. संबंधित ट्रॅक्टर अरुण पिपरे यांच्या नावावर असल्याचे समोर आले. पत्नीच्या नावावर असल्याचे भासवून विश्वास संपादन केल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे. तसेच पैसे परत मागितल्यावर शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.

अगरबत्ती प्रकल्पातही गैरव्यवहाराचा आरोप

दरम्यान, २०२० मध्ये अगरबत्ती उद्योगासाठी ‘पंतप्रधान स्वयंरोजगार योजना’ अंतर्गत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे ४० गरीब शेतकरी व शेतमजूर महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्येकी १ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून त्यातील मोठा हिस्सा स्वतःच्या खात्यात वळवण्यात आल्याचा दावा आहे. महिलांना केवळ १० हजार रुपये देण्यात आले, तसेच १ लाख रुपये किंमतीच्या मशीनऐवजी सुमारे २५ हजार रुपयांच्या निकृष्ट दर्जाच्या मशीन देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दोन वर्षांपासून तक्रारी; उपोषणानंतर गुन्हा

गेल्या दोन वर्षांपासून संबंधित प्रकरणी तक्रारी देऊनही गुन्हा दाखल होत नसल्याचा आरोप करत महिलांनी २३ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. आंदोलनानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ४०६, ४२०, ५०४, ५०६ व ३४ अन्वये आशिष पिपरे, सोनाली पिपरे व अरुण पिपरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

दरम्यान, नगरसेवक आशिष पिपरे यांनी यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले असल्याचे समजते.