ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता . १ :चामोर्शी येथील अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली महिलांना रोजगाराचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या आरोपांवरून जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी (भाजप) ने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (काँग्रेस) वर जोरदार पलटवार करत संबंधित व्यक्ती आशिष पिपरे यांचा भाजपाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे काही महिला उपोषणाला बसल्या आहेत. या उपोषणस्थळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी भेट देत भाजपावर थेट आरोप केले. “भाजपाचे नगरसेवक आशिष पिपरे यांच्यामुळे महिलेला उपोषण करावे लागत असून पक्ष त्यांना पाठिशी घालत आहे,” असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.
मात्र पत्रकारांशी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांनी हे आरोप फेटाळून लावले. “आशिष पिपरे पूर्वी भाजपाचे पदाधिकारी होते, मात्र सध्या त्यांना पक्षात कोणतेही पद किंवा जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यांचा भाजपाशी कोणताही संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, चामोर्शी नगरपंचायतीमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची नियुक्ती झाल्याचा दावा करत, “त्यांचे अनेक राजकीय पक्षांतील नेत्यांशी वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कृतीचा संबंध भाजपाशी जोडणे चुकीचे आहे. भाजपावर आरोप करणे हा केवळ राजकीय स्टंट आहे,” असेही बारसागडे म्हणाले.
भाजपाने पुढे सांगितले की, पक्ष हा सामान्य जनतेचा पक्ष असून कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला किंवा गैरप्रकारांना पाठिंबा देत नाही. “महिलांच्या भावनांचा राजकीय स्वार्थासाठी वापर करू नये,” असे आवाहनही पक्षाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटे आरोप करणाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडले जातील, असा निर्धारही पक्षाने व्यक्त केला आहे.










