ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १ :दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूतस्करी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या तस्करांवर गडचिरोली पोलिसांनी रविवार (ता. १) सापळा रचून कारवाई केली. यात चारचाकी वाहनासह तब्बल १२ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पण अंधाराचा फायदा घेत तस्कर मात्र पळाले.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारूविक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरूद्ध पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रविवारी स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने सापळा रचून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरूद्ध कारवाई केली. अजय चिचघरे रा. खरपुंडी, ता. जि. गडचिरोली हा आपल्या साथीदाच्या मदतीने चारचाकी वाहन क्र. यू. पी. १६ डी. बी. ०५९० ने पोटेगाव पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करून चिल्लर विक्रेत्यांना पुरवठा करणार आहेत, अशी गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदारांनी नवरगाव येथे पोहचून दोन पंचासह नवरगाव येथील रहिवासी श्यामराव अलीवार यांच्या राहते घराच्या समोर सापळा रचला. यावेळी पोलिस पथकास मिळालेल्या माहितीप्रमाणे चारचाकी वाहन क्र. यू. पी. १६ डी. बी. ०५९० वाहन घराच्या दिशेन येताना दिसून आले. यावेळी पोलिस पथकाने अडथळा निर्माण करून वाहनास थांबवण्याचा इशारा केला. परंतु वाहन चालकाने वाहन रत्याच्या कडेला थांबवून वाहनातील २ व्यक्ती उतरून अंधाराचा फायदा घेत पळून गेले. यानंतर पोलिस पथकाने या वाहनाची तपासणी केली असता, चारचाकी वाहनामध्ये बिअरच्या २२ खर्ड्याचे प्रति बॉक्समध्ये १८० एम. एल. क्षमतेच्या सिलबंद ४८ काचेच्या सिलबंद बॉटल अशा एकूण १०५६ काचेच्या सिलबंद बॉटल विक्री किंमत ३०० रुपयेप्रमाणे अंदाजे एकूण किंमत ३ लाख १६ हजार ८०० रुपये, ९० एम. एल. मापाच्या १०० नग बॉटल्स एकूण किंमत १५ हजार रुपये, १ लिटर मापाच्या २३ नग सिलबंद काचेच्या बॉटल विक्री किंमत दोन हजार रुपये प्रति काचेची बॉटलप्रमाणे अंदाजे एकूण किंमत ४६,००० रुपये,बिअरच्या ५०० एम. एल. मापाच्या ६ सिलबंद खर्ड्यांच्या बॉक्समध्ये प्रति बॉक्स २४ नग प्लॉस्टिक टिन असे एकूण १४४ प्लॉस्टीक टिन विक्री किंमत ३०० रुपये प्रति टिन प्रमाणे अंदाजे एकूण किंमत ४३,२०० रुपये, देशी-विदेशी दारू वाहतूककरिता वापरण्यात आलेली एक पांढऱ्या रंगाचे टाटा कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक यू. पी. १६ डी. बी. ०५९० जुनी अंदाजे किंमत ८,००,००० रुपये, असा एकूण १२ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. या घटनेच्या अनुषंगाने अजय चिचघरेविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेणे सुरू असून गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक सीमा किंकर करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधीरा, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक समाधान दौड, पोलिस अंमलदार रोहीत गोंगले, प्रशांत गरफडे, चालक पोलिस अंमंलदार रामदास उईनवार यांनी पार पाडली. रंगपंचमीनिमित्त अनेकजण दारूपार्ट्या करतात. त्यामुळे दारूतस्करांवर पोलिसांची करडी नजर आहे.
——————










