ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २ : कोरची येथील आंबेखारी जंगलात अडीच वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा गुन्हा उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे हे खून प्रकरण समाजमन हादरवणारे असून जमिनीच्या लोभामुळे मोठ्या काकाने आपल्या पुतण्याचा साथीदाराच्या मदतीने खून केल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. जमिनीच्या वाटणीसाठी युवकाचा खून केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कोरची पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याअंतर्गत रामदास अमरू कळ्यामी (वय ५९) रा. आंबेखारी आणि दसरू ठाकूरराम कल्लो (वय ४२) रा. बोंडे यांना अटक करण्यात आली आहे. महेश श्यामसाय कळ्यामी (वय २३) रा. आंबेखारी याचा खून करून त्याचा मृतदेह जंगलात दफन केल्याचा आरोप रामदास कळ्यामी आणि दसरू कल्लो यांच्यावर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश कळ्यामी हा जमिनीच्या वाटणीसाठी भांडत होता. जुलै २०२४ मध्ये त्याने रामदास कळ्यामी याच्याशी जमिनीच्या हिश्यावरून भांडण केले होते. त्यानंतर १७ नोव्हेंबर २०२४ रोजी रामदास आणि दसरू यांनी महेशला कुऱ्हाडीने मारून जंगलात दफन केले होते. महेश बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलिसात दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी महेशचा मृतदेह जंगलातून उकरून काढला होता. डीएनए परीक्षणानंतर महेशचा मृतदेह असल्याची पुष्टी झाली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात रामदास आणि दसरू यांचा गुन्ह्यातील सहभाग उघडकीस आला.मृत महेशचे वडील श्यामसाय आणि मोठे काका रामदास यांच्याकडे जमिनीच्या हिश्श्यावरून वाद होता. जुलै २०२४ मध्येदेखील जमिनी्या वादातून रामदास आणि महेशचे भांडण झाले होते. वादाच्या दिवशी रामदास आणि त्याचा साथीदार दसरू कल्लो यांनी महेशचा पाठलाग करून त्याला जंगलात नेत खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह जमिनीत गाडून टाकला. दरम्यान नोव्हेंबर २०२४ मध्ये महेशची आई दुमलाबाई जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेली असता तिला एका ठिकाणी मानवी सांगाडा आढळून आला. हा सांगाडा आपल्या बेपत्ता मुलाचा असावा, असा संशय तिने व्यक्त केला. मृतदेहाची ओळख पटवणे कठीण असल्याने त्याचे अवशेष डीएनए चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यानंतर सांगाडा महेशचाच असल्याचे निष्पन्न झाले.आरोपींना सोमवार (ता. २) अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, दलपत मडावी, पोलिस हवालदार लक्ष्मण नैताम, हस्तकला दर्रो, इन्साराम ताराम, धोंडणे यांनी या गुन्ह्याची उकल केली. सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख तपास करत आहेत.
————————————–










