महिलांच्या कार्याचा गौरव; राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे, खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते गौरव सोहळा उत्साहात .

145

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. ९ :     ८ मार्च , जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने महिला सन्मान व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवनेरी कॉलनी, आरमोरी रोड, गडचिरोली येथील सौ. मनीषाताई मडावी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. नेते यांनी सर्व माता-भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नसून समाजाच्या प्रगतीला दिशा देणारी प्रेरणादायी शक्ती असल्याचे सांगितले. इतिहासातील अनेक महान स्त्रियांनी आपल्या त्याग, धैर्य आणि नेतृत्वातून समाजाला नवी दिशा दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सन्मानासाठी विविध योजना राबवल्या असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहीण’सारखी महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. त्या प्रेरणेतून महिलांनी विविध क्षेत्रात पुढे येऊन समाजनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

या कार्यक्रमात पत्रकारिता, गायन, योग, उद्योजकता तसेच सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाला मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भारत खटी, भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, जावेदा शेख, तेजस्विनी भजे, राणी गोपशेटिवार, लता लाटकर, पुनम हेमके यांच्यासह महिला कार्यकर्त्या व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी रेखाताई डोळस, डॉ. भारत खटी आणि योगिता पिपरे यांनीही मनोगत व्यक्त करत महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला व समाजातील विविध क्षेत्रात महिलांनी नेतृत्व करत प्रगतीसाठी योगदान द्यावे, असा संदेश दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा मडावी यांनी केले. सूत्रसंचालन मानवाधिकार संघटनेच्या शहराध्यक्षा स्नेहा मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन खेडेकर ताई यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत समाजात महिला सशक्तीकरणाचा सकारात्मक संदेश देण्यात आला.