ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली, ता. १३ : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व मुलींचा सत्कार, महिला सुरक्षेवर व्याख्यान तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार मिलिंद नरोटे यांच्या कार्यालयातील सभागृहात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष योगिता प्रमोद पिपरे होत्या. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, स्त्री ही सृष्टीची शक्ती असून तिचे विविध नात्यांमधील योगदान अमूल्य आहे. भारतातील अनेक महिलांनी विविध क्षेत्रांत उच्च पदांवर पोहोचून स्वतःचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, सुषमा स्वराज, द्रौपदी मुर्मू, निर्मला सीतारामन, धावपटू पी. टी. उषा तसेच अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांसारख्या प्रेरणादायी महिलांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. आजच्या काळात महिला डॉक्टर, वकील, अभियंते, शास्त्रज्ञ, वैमानिक तसेच आयएएस व आयपीएस पदांवरही यशस्वीपणे कार्यरत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे (गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली) यांनी महिला व क्रीडापटूंना मार्गदर्शन करताना महिला सशक्तीकरण आणि सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये धनुर्विद्या खेळाडू कु. प्रितीलता पुजेरी, अनु नैताम, कौमुदी श्रीरामवार, कराटेपटू स्वरा नेरकर, आरोही चव्हाण तसेच सॉफ्टबॉल खेळाडू संग्रामे आणि मार्शल आर्टपटू एंजल देवकुळे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाला योगिता भांडेकर, डॉ. चंदाताई कोडवते, प्रमोद पिपरे, प्रकाशभाऊ गेडाम, रमेश भुरसे, शालिनीताई पोहनेकर, सीमाताई कन्नमवार, शिल्पा हेमके, प्रतिभाताई चौधरी, कविताताई उरकुडे, भूमाला परचाके, किरण चचाने, अनिता राय आणि रुमनबाई ठकरे यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील अनेक महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा महामंत्री अर्चनाताई बोरकुटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शालिनीताई पोहनेकर यांनी केले. महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.










