लाहेरी आठवडी बाजारात पोलीस दलाचे आरोग्य शिबिर

42
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा लाहेरी येथील आठवडी बाजारादरम्यान आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन

ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली (Gadchiroli)दि. 13/04/2026

1.या अभिनव उपक्रमादरम्यान उपपोस्टे लाहेरी हद्दीतील एकूण 107 नागरिकांची तज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा.

2.सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली व सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला उपक्रम.

3.आरोग्य शिबिरादरम्यान फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून शहीद जवानांचे बलिदान व पोलीस दलाच्या कार्याबद्दल करण्यात आली जनजागृती.

गडचिरोली पोलीस दलाकडून जिल्ह्रातील नागरिकांसाठी वेळोवेळी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. जिल्ह्रामधील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत देखील आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाकडून विविध आरोग्य मेळावे आयोजित केले जात असतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने काल दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली व सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा लाहेरी येथील आठवडी बाजार परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्य सुविधांविषयी जनजागृती करुन नागरिकांना विविध आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीचे डॉ. आशिष खुने (फिजीशियन), महिला व बाल रुग्णालय गडचिरोली डॉ. प्रशांत आखाडे (स्त्रीरोग तज्ञ), पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश चिचघरे, डॉ. श्रेया कुमरे तसेच 09 बटा. सीआरपीएफचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीप शेखर मोहन यांचे नेतृत्वात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

सदर मेळाव्यादरम्यान हद्दीतील सुमारे 107 नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करून आवश्यकतेनूसार नागरिकांना मोफत औषधे उपलब्ध करुन देण्यात आली तसेच विविध आजारांविषयी व पोषण समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एकूण 08 नागरिकांना आवश्यकतेनूसार विविध रुग्णालयांच्या ठिकाणी पुढील तपासणीसाठी शिफारस केलेली आहे. तसेच स्त्रीरोग तज्ञांकडून गरोदर माता व इतर महिलांची तपासणी करण्यात येऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सन 2021 पासून आजपावेतो एकूण 192 आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून जवळ-जवळ एकूण 42,000 हजार पेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी केलेली आहे.

तसेच एकूण 05 रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून एकूण 4,361 युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. यासोबतच ऑपरेशन रोशनीच्या माध्यमातून एकूण 9,971 पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करुन एकूण 1,412 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्रात कार्यरत असतांना शहीद जवानांनी दिलेल्या बलिदानाबद्दल, सी-60 जवानांच्या शौर्याबद्दल व नागरी कृती उपक्रमांबद्दल आठवडी बाजारात उपस्थित नागरिकांना विविध बॅनरच्या माध्यमातून माहिती देण्यात येऊन जनजागृती करण्यात आली.

सदर आरोग्य शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली श्री. सुहास गाडे, कमांडंट सीआरपीएफ 09 बटा. श्री. शंभु कुमार, प्रभारी पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोस्टे लाहेरीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. गणेश इंगळे, परिपोउपनि. ऋषिकेश कोरे, सिआरपीएफचे इन्स्पेक्टर श्री. बिश्वाल व पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडले.