Home Gadchiroli राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी गडचिरोली जिल्ह्याचा संघ रवाना ११ खेळाडू जळगाव येथे...

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी गडचिरोली जिल्ह्याचा संघ रवाना ११ खेळाडू जळगाव येथे दाखविणार आपली ताकद; मान्यवरांकडून यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा

45

ग्लोबल गडचिरोली न्यूज

 

गडचिरोली, दि. १० जून : गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्याचा ११ सदस्यीय संघ जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. दि. १० ते १५ जून २०२६ या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्याचे खेळाडू विविध वयोगटांमध्ये आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

 

स्पर्धेसाठी कब्स क्लास (यू-११) गटातून कुश राकेश कोहपरे व प्रथमेश श्रीकृष्ण जुवारे, कॅडेट (यू-१३) गटातून राजवीर प्रकाश लेकामी, तर कॅडेट मुली गटातून आध्या यशवंत कुरुडकर यांची निवड झाली आहे.

 

सब-ज्युनिअर (यू-१५) मुलांच्या गटातून ईशान विनिश भांडेकर, शिवांश शामराव उसेंडी, विहान किशोर बोडकर, अर्पित पंकज धुडसे आणि धनंजय गुणाजी धोटे यांची निवड करण्यात आली आहे. तर सब-ज्युनिअर मुलींच्या गटातून निधी भास्कर गोटा आणि आदिती गिरीधर बांते या खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

 

या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक पंकज मडावी यांचे मार्गदर्शन लाभत असून संघटनेचे सचिव यशवंत कुरुडकर, सहसचिव महेश निलेकार आणि संतोष गैनवार यांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा देत आत्मविश्वासाने खेळण्याचे आवाहन केले.

 

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाडे, गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. मिलिंद नरोटे, उपाध्यक्ष जगदीश मस्के, अनिलभाऊ तिडके, प्रभाताई भरडकर, राजेश पद्मगौरवार, राकेश कोहपरे, प्रवीण मेश्राम, श्रीकृष्ण जुवारे, रजत देशमुख, संजय मानकर, अनिकेत नैताम आणि प्रसाद टेपलवार यांनी संघातील सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याचा विश्वास व्यक्त केला.

 

गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील बॉक्सिंग खेळाला मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे अनेक युवा खेळाडू पुढे येत असून, यंदाच्या राज्यस्तरीय स्पर्धेतही गडचिरोलीच्या खेळाडूंकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.