ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २८ : येथील कॅाम्प्लेक्स परिसरातील भूमी अभिलेख कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्या दिनेश काकडे याच्यावर त्याच विभागाच्या लगतच असलेल्या वरिष्ठ कार्यालयात (उपअधीक्षक) कार्यरत महिला शिपायाच्या मुलाने चाकूने प्राणघातक हल्ला केला. हा थरार टी-पॅाईंट चौकात गुरुवार (ता. २७) संध्याकाळी ४. ३० वाजताच्या सुमारास घडला. गडचिरोली पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत हल्लेखोर युवकाला अटक केली आहे. जखमी शिपायावर तातडीने शस्रक्रिया करून १७ टाके लावण्यात आले.
सौरभ ताटीवार असे हल्लेखोर युवकाचे नाव आहे. त्याची आई भूमि अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक कार्यालयात शिपाई आहे, तर जखमी दिनेश काकडे हा कनिष्ठ कार्यालयात शिपाई आहे. गुरूवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास दिनेश नेहमीप्रमाणे टी-पॅाईंट चौकात चहा घेण्यासाठी गेला असताना सौरभ ताटीवार तिथे आला आणि त्याने आपल्याजवळ लपवून ठेवलेला धारदार चाकू काढत दिनेश काकडे यांच्या गळ्यावर चालवला. त्यामुळे काकडेचा गळा बराच कापला गेला. पण त्याही अवस्थेत त्यांनी जीव वाचवत आणि वाचवा-वाचवा असे ओरडत त्याने भूमी अभिलेख कार्यालयात धाव घेतली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आरोपी सौरभ ताटीवारला अडवत पोलिसांच्या ताब्यात दिले. रक्तबंबाळ झालेल्या दिनेशला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर शस्रक्रिया करण्यात आली. कापलेला गळा शिवण्यासाठी १७ टाके लागल्याचे समजते. दरम्यान आरोपी सौरभ ताटीवारविरूद्ध भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्राणघातक हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
—————————-









