दुर्धर आजाराने ग्रस्त ग्रामस्थांना मिळते १५हजाराची मदत

73

हृदयरोग, कर्करोग व किडनी आजाराच्या रूग्णांनी योजनेचा लाभ घ्यावा – आयुषी सिंह

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली २४ : ग्रामीण भागातील नागरिकांना कर्करोग, हृदयरोग व किडनीचे आजार असल्यास त्यांना उपचारासाठी अनुषंगीक बाबींकरिता मदत व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत १५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. दुर्धर आजाराच्या अधिकाधीक रुग्णांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.

जिल्हा परिषदांनी आपल्या कार्यक्षेत्रामधील रहिवाशांचे आरोग्य, सुरक्षितता, शिक्षण इत्यादी किंवा त्यांच्या सामाजिक आर्थिक किंवा सांस्कृतीक कल्याणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१च्या कलम १००(३) मधील तरतुदीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदांनी आपल्या स्वत:च्या उत्पन्नातून जिल्ह्यातील ग्रामीण जनतेमधून कर्करोग (कॅन्सर), हृदयरोग, किडनी निकामी होणे या दुर्धर रोगाने पिडीत असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत देण्याची योजना महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे दिनांक ०२नोव्हेंबर १९९५च्या पत्रान्वये राबविण्यात येत आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्हयाच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून आर्थिक मदतीचा लाभ देण्यात येत आहे. यामध्ये रुग्णाला केवळ एकदाच १५हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. याकरिता सन२०२४ -२५ करिता जिल्हा परिषदेच्या फंडातून पाच लाख रुपये तरतुद करण्यात आलेली असून मागील तीन वर्षात ७५ रुग्णांना लाभ देण्यात आलेला आहे.

 

अर्ज करण्याच्या नियम व अटी

 

अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांचे नावे सादर करावा. हृदयरोग व किडनी निकामी होणे या रुग्णांना आर्थिक मदतीचा लाभ सबंधित प्राधिकृत रुग्णालयाच्या नावाने देण्यात येतो व कर्करोग असलेल्या रुग्णांना थेट रुग्णांच्या नावे लाभ देण्यात येतो. हृदयरोग रुग्ण, कर्करोग रुग्ण, किडनी रुग्ण हा गडचिरोली जिल्हयातील ग्रामीण भागाचा रहिवासी असावा. (रहिवासी प्रमाणपत्र जोडावे). रुग्ण हा भूमीहिन, अल्पभूधारक, दारिद्रय रेषेखालील अथवा स्वातंत्र्य सैनिक असल्यास त्यास प्राधान्य देण्यात येते. रुग्ण दुर्धर रोगाने पिडीत असल्याबाबत प्राधिकृत वैद्यकिय संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांचे अथवा जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. रुग्णांनी अलीकडील एक छायाचित्र, आधार कार्डची झेरॉक्स व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत जोडावी, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.