5 मार्च रोजी गोंडवाना विद्यापीठात झाडीबोली नाट्यसंमेलनाचे आयोजन

321

झाडीबोली नाट्यकलेचा जागर व स्पर्धा महोत्सव पार पडणार

 

चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना सहभागी होण्याचे आवाहन

 

  • गडचिरोली, दि: ३

मराठी भाषा गौरव दिन तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.5 मार्च 2024 रोजी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे झाडीबोली नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. या नाट्यसंमेलनाअंतर्गत झाडीबोली नाट्यकलेचा जागर व स्पर्धा महोत्सव होणार आहे.झाडीपट्टीतील सामाजिक समस्या, भाषा, बोली, आचार- विचार, संस्कृतीची ओळख आणि अभ्यास करण्याच्या दृष्टीने तसेच झाडीपट्टी रंगभूमीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात झाडीबोली नाट्यसंमेलन पार पडणार आहे. नाट्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून लेखक तथा नाट्य समीक्षक डॉ. श्याम मोहरकर, कार्यक्रमाचे उद्घाटक पद्मश्री डॉ. परशुरामजी खुणे, प्रमुख अतिथी अनिरुद्ध वनकर, सदानंद बोरकर, नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे असून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन तसेच मानव व विद्याशाखा विभागाचे अधिष्ठाता ए.एस.चंद्रमौली आदींची उपस्थिती असणार आहे.

चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सदर नाट्य संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. असे नाट्यसंमेलनाचे समन्वयक तथा मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. निळकंठ नरवाडे यांनी कळविले आहे.

विविध स्पर्धा व पारितोषिके:

या झाडीबोली नाट्य संमेलनात एकांकिका, एकपात्री नाट्यछटा स्पर्धा घेण्यात येणार असून यामध्ये सर्वोत्कृष्ट एकांकिका पारितोषिक रु. 8 हजार, उत्कृष्ट एकांकिकेस रु. 4 हजार, व उत्तेजनार्थ एकांकिकेस रु.2 हजार तसेच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देय राहील.

 

संहिता लेखन, दिग्दर्शन, स्त्री- पुरुष अभिनयासाठी प्रत्येकी एक सर्वोत्कृष्ट पारितोषिक देण्यात येणार असून सर्वोत्कृष्ट पारितोषिक रु. 2 हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देय राहील. तसेच एकपात्री अभिनय, नाट्यछटास सर्वोत्कृष्ट पारितोषिक रु. 4 हजार, उत्कृष्ट पारितोषिक रु. 2 हजार, तर उत्तेजनार्थ पारितोषिक रु.1 हजार तसेच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देय राहील.

स्पर्धेचे नियम व अटी:

स्पर्धा झाडीबोली मराठी भाषेतच होईल.सदर स्पर्धा गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील महाविद्यालयांनाच लागू राहील. सादरीकरणात कोणत्याही जातीचा, धर्माचा, राजकीय व्यक्तीचा उल्लेख नसावा. सामाजिक तेढ निर्माण होईल असे सादरीकरण नसावे. एकांकिकेचा कालावधी कमीत कमी 30 मिनिटे जास्तीत जास्त 45 मिनिटे असेल तर एकपात्री अभिनयाचा कालावधी 10 मिनिटे राहील. सर्व सहभागी कलावंतांना प्रमाणपत्र देण्यात येईल. झाडीबोली एकांकिका व एकपात्री अभिनय 10 पेक्षा अधिक आल्यास दि. 5 व 6 मार्च या दोन दिवस कालावधीत घेण्यात येईल. स्पर्धेची वेळ सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत असेल. झाडीबोली नाट्य संमेलनातील स्पर्धकांना भोजन व प्रवास स्व:खर्चाने करावा लागेल. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच प्रवेश अर्जासाठी प्रा. डॉ. निळकंठ नरवाडे यांच्या 9503081790, 8329394517 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.