गडचिरोली, ता. २७ : सत्तेसाठी भाजपशी हातमिळवणी करणारे एकनाथ शिंदे, अजित पवार गटाची अवस्था अतिशय वाईट झाली असून त्यांना पुढचे दिवस भाजपचे गुलाम म्हणूनच काढावे लागतील, अशी टीका काॅंग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी बुधवार २७ मार्च रोजी आपला नामनिर्देशन अर्ज सादर केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमांनंतर आयोजित पत्रकार परीषदेत विजय वडेट्टीवार बोलत होते. पुढे वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधारी हतबल झाले आहेत. अजित पवार, शिंदे गटाची स्थिती बघता त्यांच्यापेक्षा रस्त्यावरचा भिकारी बरा,असे वाटत आहे. जनता डॉ. किरसान यांना नक्की विजयी करेल. आमच्या विजयाची सुरुवात गडचिरोली – चिमूर लोकसभेपासून होईल, असेही ते म्हणाले. भाजपमध्ये गेलेले माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी यांचा पोपट झाला असून ते भाजपचे दाणे खाऊन पोपटपंची करत कुणावरही आरोप करत राहतील, असेही ते म्हणाले. या पत्रकार परीषदेला उमेदवार डॉ. नामदेव किरसान, माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, बबनराव तायवाडे, माजी आमदार आनंदराव गेडाम, पेंटारामा तलांडी, रवींद्र दरेकर, अजय कंकडालवार तसेच महाविकास आघाडीत समाविष्ट पक्षाचे नेते उपस्थित होते.









