ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १२ : अजुनही जमीन अधिग्रहण न झालेल्या चिचडोह बॅरेजच्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना सरकारने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी प्रकल्पबाधितांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. देवराव होळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असता या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह न्याय मिळवून देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार, असे आश्वासन आमदार डाॅ. होळी यांनी दिले.
चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सिंचन सुरू होऊन शेतीला पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र अजूनही त्यातील ६०-७० शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे या प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना दरवर्षी मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया तातडीने करण्यात यावी व प्रक्रिया होईपर्यंत नुकसानग्रस्तांना नियमित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली. काही दलालांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणूक करून बोगस रजिस्ट्री प्रक्रिया केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. म्हणून ज्यांनी बोगस रजिस्ट्री करून घेतली आहे अशा अधिकाऱ्यांवर व संबंधित दलालांवर कठोर कारवाई करावी, आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली. आपण या प्रकरणी जातीने लक्ष देऊन दलाल व अधिकाऱ्यांना कठोर दंड व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी निवेदकांना दिले. यावेळी शेतकरी प्रदीप साखरे, संतोष गव्हारे, देवाजी जुवारे, देवनाथ बोधलकर, सतीश भांडेकर, राजेश धोडरे यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून निवेदन दिले. याप्रसंगी भाजप जिल्हा सचिव दिलीप चलाख, प्रतिक राठी प्रामुख्याने उपस्थित होते.









