जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९४.६७ टक्के

100

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २७ : दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार २७ मे रोजी लागला असून जिल्ह्याचा निकाल ९४.६७ टक्के लागला आहे. बारावीनंतर दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल सोमवार संकेतस्थळावर दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला. जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.६७ टक्के इतका लागला असून यंदा मागील वर्षाच्या तुलनेत निकालाचा टक्का वाढला, तरीही जिल्ह्याला नागपूर विभागात चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये दहावीची परीक्षा घेतली होती. जिल्ह्यातून १४३०५ विद्यार्थी (मुले ७ हजार ३९७ व मुली ६ हजार ९०८) प्रविष्टठ होते. यापैकी प्रत्यक्षात ७ हजार २०४८ मुले व ६ हजार ७७७ मुली अशा एकूण १४ हजार २५ जणांनी परीक्षा दिली होती. यातील १३ हजार २७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६ हजार ७३३ मुले व ६ हजार ५४५ मुलींचा समावेश आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचा टक्का ९२.८९ तर मुलींचा ९६.५७ इतका आहे. मागील वर्षी जिल्ह्याचा निकाल सरासरी ९२.५२ टक्के इतका होता. टक्का कमी असतानाही गडचिरोली जिल्ह्याने विभागात तृतीय स्थान पटकावले होते. मात्र यंदा जिल्ह्याने सरासरी ९४.६७ टक्के म्हणजे २ टक्के अधिक गुण मिळवूनही विभागात चौथे स्थान मिळाले आहे.

—————————————–